भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून तिथे १० तारखेपासून ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. २०२३ हे वर्ष गाजवणारा भारताचा सलामीवीर शुबमन गिलकडे या वर्षाचा शेवट देखील 'शुभ' करण्याची सुवर्णसंधी आहे. कारण २०२३ या वर्षात सर्वाधिक शतके झळकावण्याची किमया गिल साधतो का हे पाहण्याजोगे असेल. शुबमन गिल २०२३ मध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. मात्र, शतकांच्या बाबतीत तो विराट कोहलीच्या मागे आहे.
दरम्यान, गिल आणि कोहली दोन्हीही भारतीय खेळाडूंनी यंदाच्या वर्षात शानदार कामगिरी केली. विराटने यंदा एकूण ८ शतके झळकावली, तर गिलला ७ शतकी खेळी करण्यात यश आले. त्यामुळे किंग कोहलीच्या विक्रमाची बरोबरी साधण्यासाठी गिलला एका शतकाची गरज आहे. शुबमन गिलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये किंवा ३ वन डे सामन्यांमध्ये १ शतक ठोकल्यास तो याबाबतीत विराट कोहलीची बरोबरी करेल. या सहा सामन्यांत शुबमनने २ शतके ठोकली तर तो विराटला मागे सोडेल.
ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन, जितेश शर्मा, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.
ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक
- १० डिसेंबर - डर्बन, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
- १२ डिसेंबर - जीकबेर्हा, रात्री ८.३० वाजल्यापासून
- १४ डिसेंबर - जोहान्सबर्ग, रात्री ८.३० वाजल्यापासून
गिलसाठी २०२३ 'शुभ' वर्ष२०२३ हे वर्ष शुबमन गिलसाठी खूप खास राहिले. यंदाच्या वर्षात शुबमन गिलने उत्कृष्ट फलंदाजी केली. आयपीएल २०२३ च्या हंगामात तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. यासह त्याने पहिल्यांदाच ऑरेंज कॅप पटकावली. दरम्यान, २०२३ या वर्षात क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून गिलची नोंद झाली आहे. त्याने चालू वर्षात एकूण ४५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यामध्ये ५०.४२च्या सरासरीनुसार २,११८ धावा करण्यात त्याला यश आले. वन डे मध्ये द्विशतक झळकावण्याची किमया देखील गिलने या वर्षात साधली. न्यूझीलंडविरूद्ध १४९ चेंडूत २०८ धावा करून गिल वन डे मध्ये द्विशतक झळकावणारा चौथा भारतीय ठरला.