तिरुवनंतपुरम : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुधवारपासून सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेदरम्यान भारतीय संघाला डेथ ओव्हरमधील गोलंदाजी सुधारण्यावर भर द्यावा लागणार आहे. याशिवाय फलंदाजांसाठी देखील उत्कृष्ट सरावाची संधी म्हणून या मालिकेकडे पाहिले जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने २-१ असा विजय मिळवला असून गेल्या काही महिन्यांत एकदाही न हरलेल्या आफ्रिकेशी भारत भिडणार आहे. बीसीसीआयने २३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकाला समोर ठेवून हा दौरा आखला आहे.
भारताला दोन प्रमुख गोलंदाज हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार यांची उणीव या मालिकेत भासणार आहे. दोघांनाही विश्वचषकाआधी विश्रांती देण्यात आली आहे. तर मोहम्मद शमी कोरोनातून सावरला नसल्याने मालिकेबाहेर पडला आहे. हर्षल पटेल दुखापतीतून सावरताच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला, पण त्याने १२ च्या सरासरीने धावा दिल्या. विश्वचषकात राखीव असलेल्या दीपक चहरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी मिळाली नाही, मात्र या मालिकेत तो खेळण्याची शक्यता आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील टी-20 मालिकेला आजपासून सुरूवात होणार असून पहिला सामना तिरुवनंतपुरम येथे पार पडणार आहे.
आजपासून रंगणार थरार जसप्रीत बुमराहची साथ देणाऱ्या अर्शदीप सिंगकडून डेथ ओव्हरमध्ये दमदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर डोळा ठेवून युजवेंद्र चहल याला कामगिरीत सुधारणा करावी लागेल. लोकेश राहुल ऑस्ट्रेलियाविरुद्ध फ्लॉप ठरला. विराट कोहली आणि रोहित शर्मा फॉर्ममध्ये आहेत. दिनेश कार्तिक याला अधिक संधी मिळणार हे ठरलेले आहे. हुड्डा कंबरेच्या दुखण्यामुळे बाहेर असल्याने त्याचे स्थान श्रेयस अय्यर घेऊ शकतो.
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, श्रेयस अय्यर, शाहबाज अहमद.
दक्षिण आफ्रिकेचा संघ - टेम्बा बवुमा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, ब्योर्न फोर्चून, रिझा हेंड्रिक्स, हेन्रिच क्लासेन, मार्को जानसेन, केशव महारात, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एन्रिच नॉर्खिया, वेन पारनेल, एंडिले फेलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कॅगिसो रबाडा, रिली रोसोयू, तबरेज शम्सी, ट्रिस्टान स्टब्स.