Bhuvneshwar Kumar IND vs SA 3rd T20 | टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी२० मालिकेतील तिसरा सामना विशाखापट्टणम येथे आज खेळवला जाणार आहे. पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर हा सामना जिंकणे हा भारतीय संघासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. हा सामना जिंकण्यासाठी रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला तिन्ही विभागात दमदार खेळ करावा लागणार आहे. तिसऱ्या टी२० सामन्यात चाहत्यांच्या नजरा भुवनेश्वर कुमारवर खिळल्या असतील, कारण तो मोठा विक्रम करण्याच्या नजीक आहे.
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तिसऱ्या टी२० या सामन्यात भुवनेश्वरने एक विकेट घेतल्यास तो आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पॉवर-प्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनेल. सध्या भुवनेश्वर कुमार हा वेस्ट इंडिजचा सॅम्युअल बद्री आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीसह संयुक्त पहिल्या स्थानावर आहे.
पॉवर-प्लेमध्ये सर्वाधिक टी२० बळी-
सॅम्युअल बद्री - ५० डावांत ३३ गडीभुवनेश्वर कुमार - ५९ डावांत ३३ गडीटीम साऊदी - ६८ डावांत ३३ गडीशाकिब अल हसन - ५८ डावांत २७ गडीजोश हेझलवूड - ३० डावांत २६ गडी
दरम्यान, भुवनेश्वर कुमारने दुसऱ्या टी२० सामन्यात शानदार गोलंदाजी करताना चार बळी घेतले होते. या शानदार कामगिरी नंतरही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. तिसऱ्या टी२० सामन्यातही भारतीय संघाला भुवनेश्वर कुमार कडून चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. भुवनेश्वर कुमारने २०० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २६७ बळी घेतले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत ६३, एकदिवसीय सामन्यांत १४१ आणि टी२० मध्ये ६७ बळी आहेत.