डरबन - कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली युवा भारतीय खेळाडू शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात खेळतील. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत दमदार कामगिरी करीत स्वत:ला सिद्ध करण्याची संधी प्रत्येक युवा खेळाडूकडे असेल. त्याच वेळी, संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्यापुढेही सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचे आव्हान असेल.
काही दिवसांपूर्वीच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेत सॅमसनने तडाखेबंद शतक ठोकले होते. परंतु, अभिषेकला आपल्या लौकिकानुसार कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्याच्यापुढे दमदार कामगिरी करण्याचा दबाव असेल. झिम्बाब्वेविरुद्ध जुलै महिन्यात शानदार शतक ठोकल्यानंतर अभिषेक आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये झुंजताना दिसला आहे. सॅमसनच्या कामगिरीतही सातत्याचा अभाव असल्याने त्याला अनेकदा संघाबाहेर बसावे लागले आहे.
मधल्या फळीत तिलक वर्मालाही छाप पाडावी लागेल. वेस्ट इंडिजविरुद्ध २०२३ मध्ये त्याने प्रभावी कामगिरी केली होती. परंतु, यानंतर त्याला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. तिलकने १२ सामन्यांमध्ये केवळ एकदाच अर्धशतक झळकावले आहे. यष्टिरक्षक जितेश शर्मा आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्थी यांच्यासाठी ही मालिका सुवर्णसंधी असेल. सॅमसनच्या उपस्थितीत जितेशला कितपत संधी मिळणार, हेही पाहावे लागेल.
अर्शदीप करणार नेतृत्वप्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीमध्ये अर्शदीप भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करेल. त्याच्यासह आवेश खानला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा अनुभव असून, वैशाख विजयकुमार आणि यश दयाल यांनी देशांतर्गत व आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय संघात प्रवेश केला आहे. रमनदीप सिंगचा अष्टपैलू खेळही भारतासाठी महत्त्वाचा ठरेल. वरिष्ठ खेळाडूही सज्जकर्णधार सूर्यकुमारसह अष्टपैलू हार्दिक पांड्या, अक्षर पटेल हे सीनिअर खेळाडूही दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गाजवण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. या तिघांची भूमिका भारतासाठी मोलाची ठरणार आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मिळालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या निर्धाराने या मालिकेत खेळेल.
प्रतिस्पर्धी संघभारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, आवेश खान आणि यश दयाल.दक्षिण आफ्रिका : एडेन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमॅन, गेराल्ड कोएत्जी, डोनोवन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को यानसेन, हेन्रीक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेविड मिलर, मिहलाली एमपोंगवाना, नकाबा पीटर, रयान रिकेल्टन, अँडिले सिमलेन, लूथो सिपम आणि ट्रिस्टन स्टब्स.
सामन्याची वेळ : रात्री ८.३० सामन्याचे स्थळ : किंग्समेड, डरबन थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ लाइव्ह स्ट्रीमिंग : जिओ सिनेमा