Zaheer Khan advice for Rahul Dravid, IND vs SA T20I : रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची ट्वेंटी-20 मालिकेतील कामगिरी निराशाजनक झालेली पाहायला मिळतेय. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला टेम्बा बवुमाच्या दक्षिण आफ्रिका संघाने सलग दोन सामन्यांत पराभूत केले. पहिल्या सामन्यात 211 धावा करूनही भारत हरला, तर दुसऱ्या लढतीतही आफ्रिकेने चार विकेट्स राखून विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.
पहिल्या सामन्यात डेव्हिड मिलर व रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ही जोडी टीम इंडियावर भारी पडली होती. या दोघांच्या नाबाद 131 धावांच्या भागीदारीने सामना फिरवला. दुसऱ्या लढतीत यष्टिरक्षक-फलंदाज हेनरीक क्लासेन भारी पडला. क्विंटन डी कॉकच्या जागी संघात स्थान पटकावणाऱ्या क्लासेनने 46 चेंडूंत 81 धावा कुटल्या. आता भारतीय संघाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी तिसरी लढत जिंकणे गरजेचे आहे. मंगळवारी होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारताचा माजी जलदगती गोलंदाज झहीर खान ( Zaheer Khan) याने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) याला सल्ला दिला आहे.
झहीर म्हणाला,''जेव्हा क्लासेन-बवुमा यांची भागीदारी जम बसवत गेली, तेथेच भारताच्या हातून सामना निसटला. भारताला ही जोडी रोखण्यासाठी चोख क्षेत्ररक्षण लावता आले नाही. या गोष्टीकडे राहुल द्रविड व टीमने लक्ष द्यायला हवे आणि त्यावर जलद तोडगा काढायला हवा. कारण, उद्याच तिसरा सामना होणार आहे. संघाला पुन्ही रिग्रुप व्हायला हवं. 40 षटकं डोळ्यासमोर ठेऊन रणनीती आखायला हवी.''
कालच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने उत्तम गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांत 13 धावांत 4 विकेट्स घेतल्या, परंतु अन्य गोलंदाजांकडून त्याला साजेशी साथ मिळाली नाही. त्यावरही झहीर म्हणाला,''पहिल्या सामन्यातही भारतीय संघ ड्रायव्हिंग सीटवर बसलेला वाटत होता. दुसऱ्या सामन्यात भुवनेश्वरने संघाला दमदार सुरूवात करून दिली, परंतु त्याच्या कामगिरीचा फायदा उचलण्यात संघ अपयशी ठरला.''
Web Title: IND vs SA T20I : former Indian Zaheer Khan shares a piece of advice for Indian team coach Rahul Dravid ahead of 3rd T20I
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.