Join us  

IND vs SA T20I Series : वर्ल्ड रेकॉर्डसाठी खेळत नाही, त्याची पर्वाही नाही; राहुल द्रविडनं सांगितलं टीम इंडियाचं अंतिम ध्येय! 

India vs South Africa T20I Series : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातली ट्वेंटी-20 मालिका गुरूवारपासून सुरू होत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 12:50 PM

Open in App

India vs South Africa T20I Series : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातली ट्वेंटी-20 मालिका गुरूवारपासून सुरू होत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. लोकेश राहुलच्या ( KL Rahul) नेतृत्वाखाली युवा खेळाडूंची फळी घेऊन भारतीय संघ मैदानावर उतरणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा वेगळ्या अर्थाने खास आहे. या सामन्यात टीम इंडियाला वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकल्यास सलग 13 ट्वेंटी-20 जिंकण्याचा विश्वविक्रम नोंदवला जाईल. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, परंतु मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) याचे म्हणणे काही वेगळे आहे. ''आम्ही वर्ल्ड रेकॉर्डचा विचार करत नाही आणि आम्ही अशा आकडेवारीवर लक्ष ठेवतही नाही. जर आम्ही चांगले खेळलो तर जिंकू आणि नाही, तर पराभूत होऊ,'' असे स्पष्ट मत द्रविडने व्यक्त केले.  

भारतीय संघाने आतापर्यंत सलग 12 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत आणि त्यांनी अफगाणिस्ता व रोमानिया यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानला नमवून टीम इंडियाने वर्ल्ड रेकॉर्डचा पाया रचला. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने 12 पैकी 9 सामने जिंकले आणि आता लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली विश्व विक्रमाची नोंद होण्याची संधी आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 जूनला नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर सामना होणार आहे. राहुल द्रविडने युवा खेळाडूंना या विक्रमाकडे जास्त लक्ष देऊ नका, चांगलं खेळा, असा सल्ला दिला आहे. 

याशिवाय द्रविडने अष्टपैलू हार्दिक पांड्याचे कौतुक केले. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमिअर लीग 2022चे जेतेपद नावावर केले. ''हार्दिक पांड्याला पुन्हा टीम इंडियात बघून आनंद झाला. आयपीएलमध्ये त्याचे नेतृत्वकौशल्य पाहून प्रभावित झालो. तुमच्या लिडरशीप ग्रुपमध्ये असा एक लिडर असायला हवा. त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याची गरज आहे,''असे द्रविड म्हणाला.    

भारताचे सलग 12 विजय 

  • 66 धावांनी विजय वि. अफगाणिस्तान
  • 8 विकेट्स राखून विजय वि. स्कॉटलंड
  • 9 विकेट्स राखून विजय वि. नामिबिया
  • 5 विकेट्स राखून विजय वि. न्यूझीलंड
  • 7 विकेट्स राखून विजय वि. न्यूझीलंड
  • 73 धावांनी विजय वि. न्यूझीलंड
  • 6 विकेट्स राखून विजय वि. वेस्ट इंडिज
  • 8 धावांनी विजय वि. वेस्ट इंडिज 
  • 17 धावांनी विजय वि. वेस्ट इंडिज
  • 62 धावांनी विजय वि. श्रीलंका
  • 7 विकेट्स राखून विजय वि. श्रीलंका 
  • 6 विकेट्स राखून विजय वि. श्रीलंका 
टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाराहुल द्रविडहार्दिक पांड्या
Open in App