भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका खेळत आहे. पण, या मालिकेसाठी मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेला संधी मिळाली नाही. अशातच भारतीय संघाबाहेर असलेल्या रहाणेने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एका अडचणीचा सामना करावा लागला. खरं तर आयसीसीने भारतीय संघावर मोठा दंड ठोठावला आहे. टीम इंडियाला मॅच फीच्या १० टक्के दंड भरावा लागणार आहे. या पराभवानंतर भारतीय संघाचे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील दोन गुण देखील कमी झाले आहेत.
दरम्यान, रहाणेने चार सेकंदाचा एक व्हिडीओ शेअर केला असून तो सराव करताना दिसत आहे. तसेच 'विश्रांतीचे दिवस नाहीत' असे रहाणेने कॅप्शनमध्ये लिहिले. रहाणेच्या या पोस्टला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.
भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच कसोटी कसोटी मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी होती, पण रोहितच्या नेतृत्वातील संघाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना ३ जानेवारीपासून केपटाउनमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडिया मालिकेत १-१ अशी बरोबरी साधण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शोभारतीय फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे गोलंदाजांना लढण्याची संधी मिळाली नाही. पहिल्या डावात लोकेश राहुल (१०१) वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. तर दुसऱ्या डावात विराट कोहलीने भारतीय चाहत्यांच्या आशा जिवंत ठेवताना (७६) धावा केल्या. पण, 'विराट' खेळी सुरू असताना दुसरीकडे भारताच्या एकाही खेळाडूला फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. यजमानांनी १६३ धावांची आघाडी घेतल्यावर भारतीय संघावर दबाव वाढला होता. विराट कोहलीने अखेरपर्यंत संघर्ष केला पण टीम इंडियाला एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावात अवघ्या ३४.१ षटकांत १३१ धावांवर सर्वबाद झाला.