ICC Mens U19 World Cup 2024: दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर सध्या अंडर-१९ विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ५० षटकांच्या या विश्वचषकात भारताने सुरूवातीपासूनच चमकदार कामगिरी केली. मंगळवारी भारताच्या युवा ब्रिगेडने यजमानांना नमवून फायनलचे तिकिट मिळवले. उपांत्य सामन्यात भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान होते. पण, मराठमोळ्या सचिन धसने शानदार खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. मूळचा बीडमधील असलेल्या सचिनने ९६ धावांची अप्रतिम खेळी केली. त्याच्याशिवाय भारतीय कर्णधार उदय सहारनने ८१ धावांची खेळी केली. भारतीय कर्णधाराने १२४ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ८१ धावा करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
भारतीय संघाने ४८.५ षटकांत ८ बाद २४८ धावा करून फायनलचे तिकिट मिळवले. सचिन धसने ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ९५ चेंडूत ९६ धावांची खेळी केली. आफ्रिकेने दिलेल्या २४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला सुरूवातीला ४ मोठे धक्के बसले. आघाडीचे फलंदाज आदर्श सिंग (०), अर्शिन कुलकर्णी (१२), मुशीर खान (४) आणि प्रियांशू मोलिया (५) स्वस्तात माघारी परतले. पण मराठमोळ्या सचिन धस आणि कर्णधार उदय सहारन यांच्यात मोठी भागीदारी झाली. त्यांनी दोघांनी मिळून पाचव्या बळीसाठी १८७ चेंडूत १७१ धावा कुटल्या. आफ्रिकन गोलंदाज बळी घेण्यासाठी तरसताना दिसले. पण, सचिन धसला बाद करून यजमानांनी घरच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. शतकापासून केवळ ४ धावा दूर असताना सचिन बाद झाला अन् भारताला पाचवा झटका बसला.
अंडर-१९ विश्वचषक २०२४ चा पहिला उपांत्य सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला गेला. दक्षिण आफ्रिकेतील विलोमूर पार्क, बेनोनी इथे उपांत्य सामना पार पडला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान आफ्रिकेच्या संघाने निर्धारित ५० षटकांत ७ बाद २४४ धावा केल्या. यजमान संघाकडून लुआन-ड्रे प्रिटोरियसने सर्वाधिक ७६ धावांची खेळी खेळली. तर भारताकडून राज लिंबानीने सर्वाधिक ३ बळी घेतले. यादरम्यान त्याने ९ षटकात ६० धावा दिल्या. याशिवाय मुशीर खानने २ बळी घेतले. यादरम्यान मुशीरने १० षटकात ४३ धावा दिल्या. तर नमन तिवारी आणि सौमी पांडे यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
कोण आहे मराठमोळा सचिन धस?
भारताला फायनलचे तिकिट मिळवून देण्यात बीडच्या सचिन धसने मोलाची भूमिका बजावली. सचिनचे वडील बीडमधील आरोग्य विभागात नोकरी करत असून आई पोलीस अधिकारी आहे. आई-वडिलांनी लहानपणापासूनच सचिनच्या क्रिकेट करिअरला प्राधान्य दिलं. सचिनची आवड ओळखून अभ्यासापेक्षा त्याच्या क्रिकेट करिअवरच फोकस केला होता. दडपणातही मोठी खेळी बांधण्याचे फलंदाजीचे कौशल्य यामुळे तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आपला आदर्श मानतो. सचिन धसने बीसीसीआयच्या १४ वर्षांखालील स्पर्धेत मुंबईविरुद्ध आठव्या क्रमांकावर येऊन ३६ धावांची खेळी केली. त्यानंतर त्याला निवड समितीने वरच्या फळीत खेळण्याची संधी दिली. या संधीचे सोने करीत सचिनने गुजरात आणि सौराष्ट्रविरुद्ध अर्धशतके ठोकली. बीसीसीआयच्या १६ वर्षांखालील स्पर्धांत त्याने गुजरातविरुद्ध ११६ धावांची खेळी केल्यानंतर कधी मागे वळून पाहिले नाही. त्याचा स्वभाव शांत आहे. मात्र, तो फलंदाजी स्फोटक करतो, असे प्रशिक्षक अझहर शेख यांनी अलीकडेच 'लोकमत'शी बोलताना सांगितले होते.
Web Title: IND vs SA, U19 World Cup Team India beat South Africa by 2 wickets to enter the final, Sachin Dhas scored 96 for India while captain Uday Saharan scored an 81
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.