India vs South Africa 2nd Test: भारतीय संघाचा जोहान्सबर्ग कसोटीत पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने २४० धावांचे आव्हान सात गडी राखून पूर्ण केले आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्याआधी विराटला दुखापत झाल्याने तो संघाबाहेर होता. भारतीय संघाचे कर्णधारपद केएल राहुलकडे होते. चौथ्या डावात भारतीय गोलंदाजी अधिक आक्रमक व्हायला हवी होती अशी खंत अनेकांनी सामना संपल्यानंतर बोलून दाखवली. मात्र, विराट कोहली आणि राहुल द्रविड या जोडीने मैदानात केएल राहुलला मदत केली नाही, असा आरोप पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने यू ट्युब व्हिडीओच्या माध्यमातून केला.
"धावा कमी झाल्याने टीम इंडिया सामन्यात पिछाडीवर होती हे मला मान्य आहे पण त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना धावा करण्यासाठी झुंजवायला हवं होतं. तसं काहीच दिसलं नाही. आफ्रिकन फलंदाजांनी सहज त्यांना मिळालेलं आव्हान पार केलं. गोलंदाजी आणि गोलंदाजीतील बदल अशा दोन्ही गोष्टी नीट झाल्या नाहीत. पण यासाठी केएल राहुलला दोष देणं फारसं योग्य नाही. तो पहिल्यांदाच कसोटी संघाचं कर्णधारपद भूषवत होता. पण स्टेडियममध्ये बसलेले विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मात्र केएल राहुलला काही गोष्टी सांगायला हव्या होत्या. त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे राहुल एकटा पडला. गोलंदाजीत काय बदल करायचे याबद्दल विराट किंवा द्रविडने राहुलला मदत केली असती तर कदाचित त्याला भारतीय संघालाच फायदा झाला असता", असं रोखठोक मत पाकिस्तानी माजी फिरकीपटूने मांडले.
"त्या दोघांनी स्टेडियममधून थोडं मार्गदर्शन करणं अपेक्षित होतं. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या तिघांना छोट्या-छोट्या स्पेल टाकायला सांगणं त्यांना जमलं असतं. अश्विनचादेखील योग्य वेळी वापर करण्यात आला नाही. विजयासाठी ११ धावा शिल्लक असताना अश्विनला गोलंदाजी देण्यात आली. शमी, बुमराह दोघांनी भरपूर धावा दिल्या. सिराजनेही तेच केलं. कसोटी क्रिकेटमध्ये संयमाला खूप महत्त्व असतं, पण नेमकं तेच इथे दिसलं नाही. त्यामुळे भारतीय संघ पराभूत झाला", असंही दानिश कनेरिया म्हणाला.