India vs South Africa ODI series : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी मालिकेतील निर्णायक सामना आजपासून सुरू झाला आहे आणि त्यानंतर तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. १९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वन डे मालिकेपूर्वी भारतीय संघाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sundar) याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि तो मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे. २२ वर्षीय वॉशिंग्टन आता वन डे संघातील अन्य खेळाडूंसह केपटाऊनसाठी रवाना होण्याची शक्यताही कमी आहे. वन डे मालिकेसाठी निवडलेल्या संघातील खेळाडू बुधवारी मुंबईहून केप टाऊनसाठी रवाना होणार आहेत.
वॉशिंग्टन मागील १० महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. मार्च २०२१मध्ये तो भारताकडून अखेरचा सामना खेळला होता आणि त्यानंतर दुखापतीमुळे तो बाहेरच आहे. त्यानं दुखापतीतून सावरल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत तामिळनाडू संघाचे प्रतिनिधित्व केले होते आणि त्यानंतर त्याला वन डे मालिकेसाठी निवडण्यात आले. पण, आता कोरोना झाल्यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन लांबणीवर पडले आहे. बीसीसीआयनं त्याच्याजागी कोणाची निवड केलेली नाही, परंतु बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं Cricbuzz ला सांगितले की, तो दक्षिण आफ्रिकेला जाणार नाही. काही दिवसांपूर्वी त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याला अन्य सहकाऱ्यांसोबत आफ्रिकेला रवाना होता येणार नाही.
निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांनी अद्याप वॉशिंग्टनच्या जागी बदली खेळाडूचे नाव जाहीर केलेले नाही, परंतु लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या वन डे संघात आर अश्विन व युझवेंद्र चहल हे दोन फिरकीपटू आहेत. १९, २१ आणि २३ जानेवारीला वन डे सामने खेळवण्यात येणार आहेत.
भारताचा संघ- लोकेश राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज