India vs Sri Lanka, 1st ODI : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघात बदलाच्या वाऱ्यांना सुरुवात झाली होती. त्यामुळेच हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) ला ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार म्हणून पुढे आणले गेले. ऑस्ट्रेलियात उपांत्य फेरीत हार पत्करावी लागल्यानंतर रोहित, विराट, लोकेश हे विश्रांतीवर गेले अन् हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारताने दोन ट्वेंटी-२० मालिका खेळल्या. रोहित, विराटला आता ट्वेंटी-२० संघातून बाजूला केले जाईल अशी चर्चा रंगली होती. पण, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने त्याचे स्पष्ट मत मांडले अन् आता BCCI vs Rohit असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
रोहित, विराट यांच्यासाठी खरंच ट्वेंटी-२० संघाचे दरवाजे बंद झाले आहेत का? राहुल द्रविडचं मोठं विधान
भारतात २०२३ मध्ये वन डे वर्ल्ड कप होणार आहे आणि त्यासाठी संघातील वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, शिखर धवन आदींना तयार राहण्यास सांगितले आहे. पण, त्याचवेळी त्यांना ट्वेंटी-२० संघापासून दूर ठेवले जाईल असेही संकेत दिले गेले आहेत. त्यामुळेच श्रीलंकेविरुद्घच्या ट्वेंटी-२० मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. त्यात आता पुढील न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० संघातही रोहित व विराट यांची निवड होणार नसल्याचे संकेत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिले होते.
भारतीय संघ पुढे न्यूझीलंडविरुद्ध तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीच्या भारतीय संघात रोहित व विराट यांची निवड केली जाणार नसल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाईडस्पोर्ट्सला सांगितले होते. या दोघांशिवाय भुवनेश्वर कुमार, आर अश्विन व मोहम्मद शमी यांचाही ट्वेंटी-२० संघासाठी विचार केला जाणार नसल्याचे सांगण्यात आले होते. पण, रोहितने आज अजूनही ट्वेंटी-२० क्रिकेटमधून माघार घेण्याचा निर्णय घेतलेला नाही, हे स्पष्ट केले. ''मी ट्वेंटी-२० फॉरमॅट सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही,''असे रोहितने स्पष्ट केले. आता BCCI कडून यावर काय उत्तर येते याची प्रतीक्षा आहे. रोहित ठाम राहिल्यास हार्दिकचे ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदावर कायम राहण्याच्या स्वप्नांना धक्का बसू शकतो.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"