India vs Sri Lanka, 1st ODI Live : शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्या दमदार सुरुवातीनंतर विराट कोहलीनेही अर्धशतक पूर्ण केले. शुभमन व रोहितने पहिल्या विकेटसाठी १४३ धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर श्रेयस अय्यरला मोठी खेळी करता आली नाही. अशा परिस्थितीत विराटने मोर्चा सांभाळला अन् वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. त्याची फटकेबाजी सुरूच राहिली आणि त्यात श्रीलंकेच्या खेळाडूंनी त्याचे दोन सोपे झेल सोडले. हार्दिक पांड्या मैदानावर आल्यानंतरही विराट सुसाट सुरूच होता. पण, विराट हार्दिकवर भडकलेला दिसला.
विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम मोडून जगात अव्वल!
शुभमन आणि रोहित शर्मा यांनी टीम इंडियाला आश्वासक सुरूवात करून दिली. रोहितने वन डे क्रिकेटमधील ४७ वे अर्धशतक पूर्ण केले. शुभमनने त्याची निवड का केली गेली, हे खेळातूनच दाखवून दिले. Umpire Call ने रोहित व शुभमन या दोघांनाही जीवदान दिले. २०व्या दासून शनाकाने भारताला पहिला धक्का दिला. शुभमन ६० चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ७० धावांवर बाद झाला अन् रोहितसोबत त्याची १४३ धावांची भागीदारीही संपुष्टात आली.
रोहितची फटकेबाजी सुरूच होती, परंतु २४व्या षटकात दिलशान मदूशंकाने ही वाटचाल रोखली. रोहित ६७ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८३ धावांवर माघारी परतला. बॅटची किनार घेत चेंडू यष्टींवर आदळला. विराट कोहली व श्रेयस अय्यर यांनी धावांचा वेग कायम राखला होता, परंतु धनंजया डि सिल्वाने सापळा रचला. अय्यर २८ धावांवर झेलबाद झाला. विराटने वन डे क्रिकेटमधील ६५ वे अर्धशतक षटकार खेचून पूर्ण केले. श्रीलंकेच्या यष्टिरक्षकाने विराटचा सोपा झेल टाकला. त्यानंतर विराट सुसाट सुटला अन् लोकेश राहुलसह ७० चेंडूंत ९० धावा चोपल्या. लोकेश २९ चेंडूंत ३९ धावांवर त्रिफळाचीत झाला.
विराट काही श्रीलंकेच्या गोलंदाजांना बदणारा नव्हता, त्यात त्यांनी भारताच्या स्टार फलंदाजाला दोन जीवदान दिले. विराट दुसरी धाव घेण्यासाठी पळाला, परंतु हार्दिक पहिली धाव एवढ्या संथपणे पळाला होता की विराट दुसऱ्या धावेसाठी खेळपट्टीच्या मधोमध येऊनही तो पोहोचला नव्हता. अशात हार्दिकने विराटला माघारी जाण्यास सांगितले अन् भारतीय फलंदाज भडकला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"