India vs Sri Lanka, 1st ODI Live : फलंदाजांनी कमाल करून दाखवल्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली. मोहम्मद सिराजने ( Mohammad Siraj ) अप्रतिम गोलंदाजी करताना श्रीलंकेला दोन धक्के दिले. दुसऱ्या बाजूने मोहम्मद शमी धावांची गती रोखून ठेवताना दिसला.
विराट कोहलीच्या वादळी खेळीचा २:५० मिनिटांचा Video; शतकाचे श्रेय दिलं रोहितला, म्हणाला...
विराट कोहलीने ( Virat Kohli Century) आज वन डे क्रिकेटमधील ४५ वे शतक झळकावताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे विक्रम मोडले. विराटने ८७ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारांसह ११३ धावा केल्या. विराटचे सोडलेले दोन झेल श्रीलंकेला महागात पडले. शुभमन आणि रोहित शर्मा यांनी १४३ धावांची सलामी देताना टीम इंडियाला आश्वासक सुरूवात करून दिली. शुभमन ६० चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ७० धावांवर बाद झाला. रोहित ६७ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८३ धावांवर माघारी परतला. विराट कोहली व श्रेयस अय्यर यांनी धावांचा वेग कायम राखला होता, परंतु धनंजया डि सिल्वाने सापळा रचला. अय्यर २८ धावांवर झेलबाद झाला. सचिनने वन डे क्रिकेटमध्ये ४५ शतकांसाठी ४२४ इनिंग्ज खेळल्या, विराटने २५७ इनिंग्जमध्ये हा पराक्रम केला. भारताने ७ बाद ३७३ धावांचा डोंगर उभा केला.
मोहम्मद सिराजने त्याच्या पहिल्या तीन षटकांतच श्रीलंकेला दोन मोठे धक्के दिले. वन डे क्रिकेटमध्ये २०१९नंतर पहिल्या पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक १८ विकेट्स घेण्याच्या जोश हेझलवूडच्या ( ऑस्ट्रेलिया) विक्रमाशी सिराजने बरोबरी केली. मिचेल स्टार्क ( ऑस्ट्रेलिया) १९ विकेट्ससह अव्वल स्थानी आहे. सिराजने चौथ्या षटकात अविष्का फर्नांडोला चूक करण्यास भाग पाडले अन् उत्तुंग उडालेला चेंडू हार्दिक पांड्याने सहज टिपला. त्यानंतर त्याच्या पुढच्या षटकात कुसल मेंडिसला ( ०) भन्नाट चेंडूवर सिराजने त्रिफळाचीत केले. श्रीलंकेने २३ धावांवर २ फलंदाज गमावले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"