India vs Sri Lanka, 1st ODI Live : विराट कोहलीने ( Virat Kohli Century) आज वन डे क्रिकेटमधील ४५ वे शतक झळकावताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे विक्रम मोडले. विराटने ८७ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारांसह ११३ धावा केल्या. विराटचे सोडलेले दोन झेल श्रीलंकेला महागात पडले. गुवाहाटीच्या स्टेडियमवरील विराटच्या या स्फोटक खेळीचा २:५० मिनिटांचा व्हिडीओ बीसीसीआयने पोस्ट केला आहे. विराटने सामन्यानंतर या खेळीचे श्रेय रोहित शर्मा व शुभमन गिल यांना दिले.
विराट कोहलीने खणखणीत शतक झळकावले, सचिन तेंडुलकरलाही इतक्या वेगाने हा विक्रम नाही जमला
शुभमन आणि रोहित शर्मा यांनी १४३ धावांची सलामी देताना टीम इंडियाला आश्वासक सुरूवात करून दिली. शुभमन ६० चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ७० धावांवर बाद झाला. रोहित ६७ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८३ धावांवर माघारी परतला.विराट कोहली व श्रेयस अय्यर यांनी धावांचा वेग कायम राखला होता, परंतु धनंजया डि सिल्वाने सापळा रचला. अय्यर २८ धावांवर झेलबाद झाला. विराट सुसाट सुटला अन् लोकेश राहुलसह ७० चेंडूंत ९० धावा चोपल्या. लोकेश २९ चेंडूंत ३९ धावांवर त्रिफळाचीत झाला. विराटने ८० चेंडूंत शतक पूर्ण केले. मायदेशातील हे त्याचे २०वे शतक ठरले अन् त्याने सचिन तेंडुलकरशी बरोबरी केली. श्रीलंकेविरुद्ध विराटचे हे ९ वे शतक ठरले अन् त्याने सचिनच्या विक्रमाशी बरोबरी केली. सचिनने वन डे क्रिकेटमध्ये ४५ शतकांसाठी ४२४ इनिंग्ज खेळल्या, विराटने २५७ इनिंग्जमध्ये हा पराक्रम केला. भारताने ७ बाद ३७३ धावांचा डोंगर उभा केला.
विराट काय म्हणाला?रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी ज्याप्रकारे सुरुवात केली, त्याने माझ्यावरील दडपण कमी झाले होते आणि त्यामुळेच मी मुक्तपणे खेळलो. थोडीशी विश्रांती आणि काही सराव सत्रांमुळे मी ताजातवाना झालो होतो. बांगलादेश दौऱ्यानंतर मी येथे आलो. मला घरच्या मैदानावर दणक्यात सुरुवात करायची होती. रोहित व गिलने करून दिलेली सुरुवात मी सातत्य राखण्यात यश मिळवले याचा आनंद आहे. नशिबाचीही मला साथ मिळाली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"