India vs Sri Lanka, 1st ODI Playing XI : भारत आणि श्रीलंका यांच्यातील ३ वन डे सामन्यांची मालिका १० जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक दुपारी 1:00 वाजता होईल. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह अनेक वरिष्ठ खेळाडू वन डे मालिकेतून पुनरागमन करत आहेत. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणते बदल पाहायला मिळतील, याची सर्वांना उत्सुकता होती. रोहितने आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्याचा निर्णय जाहीर करून टाकला.
ट्वेंटी-२० तून माघार घेणार नाही! रोहित शर्माने BCCI विरुद्ध थोपटले दंड, हार्दिक तात्पुतरता कर्णधार?
या मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात शिखर धवनला स्थान देण्यात आलेले नाही. इशान किशन व शुभमन गिल हे दोन फलंदाज रोहित शर्मासह सलामीसाठी शर्यतीत आहेत. संघ व्यवस्थापनाने लोकेश राहुलवर यष्टिरक्षण व चौथ्या क्रमांकावर फलंदाजी अशी नवीन जबाबदारी दिली आहे. पण, इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवल्यानंतर यष्टींमागे कोण दिसेल, याची उत्सुकता होती. बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या वन डे सामन्यात द्विशतक झळकावणाऱ्या किशनला ( Ishan Kishan) श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत संधी मिळण्याची शक्यता नाही. रोहितनेही सांगितले. ''दुर्दैवाने इशान किशनला आम्हाला संधी देता येणार नाही. शुभमन गिल याला योग्य संधी मिळायला हवी,''असे मत रोहितने व्यक्त केले.
लोकेश राहुलची कामगिरी चांगली झाली नाही किंवा त्याला प्लेइंग ११मधून वगळले तर टीम इंडियाला यष्टिरक्षकाची गरज भासेल. अशा परिस्थितीत इशान किशन आपली जागा बनवू शकतो. श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघात फक्त दोनच यष्टिरक्षक फलंदाज आहेत. या दोन खेळाडूंपैकी फक्त एक खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये आपले स्थान निश्चित करू शकेल. श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत इशानची कामगिरी काही खास नव्हती. त्याने ३ सामन्यांत केवळ ४० धावा केल्या आहेत.
इशानने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत १० वन डे सामने खेळले आहेत. त्याने ०९ डावात ५३ च्या सरासरीने ४७७ धावा केल्या आहेत. इशानने वन डेमध्ये ३ अर्धशतकं आणि १ शतक झळकावले आहे. २१० धावा ही त्याची या फॉरमॅटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात सलामीवीराने १३१ चेंडूत २१० धावा केल्या होत्या आणि या खेळीत त्याने २४ चौकार आणि १० षटकार मारले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"