Big Blow to Sri Lanka against Team India, IND vs SL 1st T20: भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज होणार आहे. पल्लेकल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यापूर्वी श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. यजमान संघाचा वेगवान गोलंदाज बिनुरा फर्नांडो ( Binura Fernando ) पहिल्या टी२० सामन्यातून बाहेर पडला आहे. फर्नांडोच्या छातीत संसर्ग झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
श्रीलंका क्रिकेटने बिनरा फर्नांडोच्या रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली. एसएलसीने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर लिहिले की, 'छातीच्या संसर्गामुळे फर्नांडोला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या जागी स्टँडबाय खेळाडू म्हणून रमेश मेंडिसला संघात स्थान मिळाले आहे.'
श्रीलंकेला मालिका सुरु होण्याआधी तिसरा धक्का!
डावखुरा गोलंदाज फर्नांडोची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत श्रीलंकेच्या संघात स्टँडबाय खेळाडू म्हणून त्याच्या जागी रमेश मेंडिसची ( Ramesh Mendis ) निवड करण्यात आली आहे. गेल्या ७२ तासांत श्रीलंकेच्या संघात झालेला हा तिसरा बदल आहे. याआधी वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीरा ( Dushmantha Chameera ) आजारपणामुळे मालिकेबाहेर झाला. तर सराव सत्रादरम्यान दुखापत झाल्याने नुवान तुषाराने ( Nuwan Thushara ) मालिकेतून माघार घेतली.