Join us  

IND vs SL, 1st T20I Live Update : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताची ऐतिहासिक कामगिरी; श्री'लंका'हरण करून पाकिस्तानची जिरवली

India vs Sri Lanka, 1st T20I Live Update : इशान किशन ( Ishan Kishan), रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांच्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीने लखनौ स्टेडियम दणाणून सोडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 10:22 PM

Open in App

India vs Sri Lanka, 1st T20I Live Update : इशान किशन ( Ishan Kishan), रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांच्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीने लखनौ स्टेडियम दणाणून सोडले. या तिघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने २ बाद १९९ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने ( Bhuvneshwar Kumar) पहिल्या तीन षटकांत दोन धक्के देत श्रीलंकेला बॅकफूटवर फेकले. वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल व पुनरागमन करणारा रवींद्र जडेजा यांनी सुरेख गोलंदाजी करताना भारताचा विजय पक्का केला. 

इशान किशन आणि रोहित यांनी भारताला दमदार सुरूवात करून दिली. १२ व्या षटकात लाहिरू कुमाराने ही भागीदारी तोडली. त्याने रोहित शर्माला ४४ धावांवर त्रिफळाचीत केले. इशान व रोहितने पहिल्या विकेटसाठी १११ धावा जोडल्या. १७व्या षटकात इशान बाद झाला. त्याने ५६ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ८९ धावा कुटल्या. त्यानंतर श्रेयसने २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना भारताला २ बाद १९९ धावांचा पल्ला गाठून दिला. श्रेयस २८ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५७ धावांवर नाबाद राहिला. 

प्रत्युत्तरात भुवीने पहिल्याच चेंडूवर पथूम निसंकाची विकेट घेतली. भुवीने टाकलेला चेंडू पथूमने बॅटने अडवला, परंतु तो सरपटत यष्टींवर जाऊन आदळला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा भुवी पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला. त्यानंतर तिसऱ्या षटकात त्याने कामिल मिशारा ( १३) याची विकेट घेतली. त्यानंतर वेंकटेश अय्यरने श्रीलंकेला तिसरा धक्का देताना जनिथ लियानागेला ( ११) संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. तीन महिन्यानंतर पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजानेही विकेट घेतली. त्याने दिनेश चंडिमलला १० धावांवर बाद केले. युझवेंद्र चहलने ११ व्या षटकात श्रीलंकेचा कर्णधार दानुश शनाकाची विकेट घेतली. या विकेटसोबत भारताकडून ट्वेंटी-२०त सर्वाधिक ६७ विकेट्सचा विक्रम नावावर केला. त्याने जसप्रीत बुमराहला ( ६६) मागे सोडले.

वेंकटेशने आणखी एक विकेट घेतली. त्याने चमिका करुणारत्नेला ( २१) माघारी पाठवले. चरिथ असालंका एका बाजून खिंड लढवत होता आणि त्याने वेंकटेशने टाकलेल्या १८व्या षटकात २१ धावा चोपल्या. भुवनेश्वरने २ षटकांत ९ धावांत २ विकेट्स घेतल्या. वेंकटेशने ३६ धावांत २ बळी टिपले. युझवेंद्र व जडेजा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. असालंका सोडल्यास श्रीलंकेच्या अन्य फलंदाजांकडून संघर्ष दिसला नाही. श्रीलंकेला ६ बाद १३७ धावा करता आल्या आणि भारताने ६२ धावांनी सामना जिंकला. 

भारताचा हा सलग १०वा ट्वेंटी-२० विजय आहे आणि आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यांनी पाकिस्तानचा २०१८ साली सलग ९ सामने जिंकण्याचा विक्रम मोडला. अफगाणिस्ता १२ विजयांसह अव्वल क्रमांकावर आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारोहित शर्माइशान किशनभुवनेश्वर कुमार
Open in App