India vs Sri Lanka, 1st T20I Live Update : इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी करताना भारतासाठी मजबूत पाया रचला. रोहित ३२ चेंडूंत २ चौकार व १ षटकारासह ४४ धावांवर माघारी परतला, परंतु इशानची आतषबाजी काही थांबता थांबत नव्हती...
श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात आज सहा बदल पाहायला मिळाले. संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह व युझवेंद्र चहल यांचे पुनरागमन झाले, तर दीपक हुडाचे पदार्पण झाले. इशान किशन आणि रोहित यांनी भारताला दमदार सुरूवात करून दिली. इशान किशन आज तुफान फॉर्मात होता. तो श्रीलंकेच्या गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडला. ७व्या षटकात जेफरी वंदेर्सायच्या गोलंदाजीवर इशानचा फटका चूकला अन् चेंडू हवेत उडाला, परंतु लियानागे हे झेल टिपण्यात चूक केली. इशानला ४३ धावांवर जीवदान मिळाले.
इशानने ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याआधी रोहित शर्माने ३८ धावा करून मोठा विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा मान रोहितने पटकावला. त्याने ३३००* धावा करताना मार्टिन गुप्तील ( ३२९९) व विराट कोहली ( ३२९६ ) यांना मागे टाकले. इशान व रोहित या जोडीनं १०.२ षटकांत शतकी भागीदारी पूर्ण केली. वैद्यकिय उपचार घेतल्यानंतर इशान मैदानावर खेळत राहिला, परंतु १२ व्या षटकात लाहिरू कुमाराने ही भागीदारी तोडली. त्याने रोहित शर्माला ४४ धावांवर त्रिफळाचीत केले. इशान व रोहितने पहिल्या विकेटसाठी १११ धावा जोडल्या.
इशानने फटकेबाजी सुरू ठेवली होती. त्याने ७२ धावांचा पल्ला पार करताच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त भारताच्या यष्टिरक्षकाने केलेली सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम नोंदवला. त्यानं २०१९मध्ये रिषभ पंतने वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद ६५ धावांचा विक्रम मोडला. श्रेयस अय्यर अधिक स्ट्राईक इशानलाच देण्याचा प्रयत्न करताना दिसला आणि इशानही चौफेर फटकेबाजी करून फलंदाजीचा आस्वाद लुटत होता. १७व्या षटकात इशान बाद झाला. त्याने ५६ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ८९ धावा कुटल्या.