India vs Sri Lanka, 1st T20I Live Update : वेस्ट इंडिजवर निर्भेळ यश मिळवल्यानंतर भारतीय संघ आता श्रीलंकेचा पाहुणचार करणार आहे. लखनौ येथे होणाऱ्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) सहा बदलांसह मैदानावर उतरला आहे. विराट कोहली, रिषभ पंतची विश्रांती आणि दीपक चहर व सूर्यकुमार यादव यांची दुखापत यामुळे रोहितला या मालिकेत अजून प्रयोग करता येणार आहेत. पण, रोहितने आजच्या सामन्यासाठी सांगितलेल्या सहा नावांमध्ये ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) याचे नाव नसल्याने सर्वांना आश्चर्य वाटले, त्यात रोहितने सांगितलेलं कारण ऐकून धक्का बसला.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून वन डे संघात पदार्पण करणाऱ्या दीपक हुडाने ( Deepak Hooda) आज ट्वेंटी-२० संघातही पदार्पण केले. हुडाने दोन वन डे सामन्यांत ५५च्या सरासरीने ५५ धावा केल्या आणि १ विकेटही घेतली आहे. भारतीय संघात आज सहा बदल पाहायला मिळाले. संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह व युझवेंद्र चहल यांचे पुनरागमन झाले, तर दीपक हुडाचे पदार्पण झाले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत ऋतुराजला सलामीला खेळण्याची संधी रोहितने दिली, परंतु ४ धावा करून तो माघारी परतला. त्यानंतर आज तो पुन्हा बाकावर बसला.
नाणेफेक झाल्यानंतर रोहित म्हणाला, आम्हालाही धावांचा पाठलाग करायचा होता. या कालावधीत भारतीय खेळपट्टींचा आम्हाला तितकाचा अंदाज नाही. तीन-चार वर्षांपूर्वी आम्ही इथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलो होतो. सातत्यपूर्ण कामगिरी करणे आमच्या हाती आहे, परंतु बरेच नवे चेहरे असल्याने आमच्यासमोर मोठं आव्हान आहे. आजच्या सामन्यात सहा बदल केले आहेत. सॅमसन, बुमराह, भुवी, चहल, जडेजा व हुडा हे प्लेइंग इलेव्हनमध्ये आहेत. ऋतुराज आजच्या सामन्यात खेळणे अपेक्षित होते, परंतु त्याच्या मनगटाला दुखापत झाली. त्यामुळे तो आज खेळणार नाही.''