India vs Sri Lanka, 1st T20I Live Update : भारताच्या २ बाद १९९ धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेला ६ बाद १३७ धावा करता आल्या आणि भारताने ६२ धावांनी सामना जिंकला. इशान किशन ( Ishan Kishan), रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांच्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीने लखनौ स्टेडियम दणाणून सोडले. त्यानंतर भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar), वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल व पुनरागमन करणारा रवींद्र जडेजा यांनी सुरेख गोलंदाजी करताना भारताचा विजय पक्का केला. भारताचा हा सलग १०वा ट्वेंटी-२० विजय आहे आणि ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. पण, रोहितने संघाच्या चुकांवर बोट ठेवताना सहकाऱ्यांना इशारा दिला.
इशान किशन आणि रोहित ( ४४) यांनी पहिल्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी केली. इशानने ५६ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ८९ धावा कुटल्या. त्यानंतर श्रेयसने २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना भारताला २ बाद १९९ धावांचा पल्ला गाठून दिला. श्रेयस २८ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५७ धावांवर नाबाद राहिला. प्रत्युत्तरात भुवनेश्वरने २ षटकांत ९ धावांत २ विकेट्स घेतल्या. वेंकटेशने ३६ धावांत २ बळी टिपले. युझवेंद्र व जडेजा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. असालंका सोडल्यास श्रीलंकेच्या अन्य फलंदाजांकडून संघर्ष दिसला नाही. श्रीलंकेचा चरिथ असालंकाने एकट्याने संघर्ष करताना नाबाद ५३ धावा केल्या.
रोहित शर्मा काय म्हणाला?''तुम्हाला असा पाठिंबा मिळाला, तर हे असे घट्ट नाते तयार होते. इशान किशनची क्षमता मी चांगली ओळखून आहे आणि त्याला आज त्या क्षमतेने खेळताना पाहून आनंद झाला. सहाव्या षटकानंतर त्याची खेळी बहरत गेली. मैदानावर जाऊन त्याने फक्त चेंडू टोलवले नाही, तर गॅपमधून धावा काढल्या. रवींद्र जडेजासाठीही मी खूप आनंदी आहे. त्याच्याकडून आम्हाला अधिक अपेक्षा आहेत आणि म्हणून त्याला आज फलंदाजीला वरच्या क्रमांकावर पाठवले. पुढील सामन्यातही असाच प्रयोग तुम्हाला दिसेल. तो चांगल्या फॉर्मात आहे, विशेषतः कसोटीत आणि त्याचा आम्हाला मर्यादित षटकांच्या सामन्यात उपयोग करून घ्यायचा आहे,''असे रोहित म्हणाला.
त्याने पुढे म्हटले की,''मला मोठ्या मैदानावर खेळायला आवडते, कारण तेथे फलंदाजाची खरी कसोटी लागते. कोलकातात तुम्हाला षटकार खेचण्यासाठी चेंडूला फक्त दिशा दाखवावी लागले. या सामन्यातही काही झेल सुटले आणि या स्तरावर हे अपेक्षित नाही. फिल्डींग कोचना त्यावर आता काम करावे लागेल. ऑस्ट्रेलियात सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणारा संघ मला हवा आहे.''