India vs Sri Lanka 1st T20I Live Updates : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नवीन वर्षाची विजयाने सुरुवात केली. दीपक हुडा व अक्षर पटेल यांच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर भारताने आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. पदार्पणवीर शिवम मावीने प्रभावी गोलंदाजी केली आणि त्याला हर्षल पटेल व उम्रान मलिक यांची साथ मिळाली. श्रीलंकेच्या दासून शनाकाने अखेरच्या षटकांत चांगला खेळ करताना भारतावर दडपण निर्माण केले होते, परंतु त्याची विकेट पडली अन् भारताचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. भारताने या विजयासह मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. Shivam Mavi ने चार विकेट्स घेतल्या.
इशान किशनने कसला अविश्वसनीय कॅच घेतला; वानखेडे स्टेडियमवर त्याच्या नावाचा जय जयकार झाला, Video
पदार्पणवीर शिवम मावीने दुसऱ्या षटकात पथुम निसंकाला ( १) व चौथ्या षटकात धनंजया सिल्वाला ( ८) बाद केले. चमिका असलंका व कुसल मेंडिस यांनी श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. उम्रान मलिकच्या वेगवान चेंडूवर पुल मारण्याचा चमिकाचा ( १२) प्रयत्न फसला अन् यष्टीरक्षक इशान किशनने फाईन लेग बाऊंड्रीच्या दिशेने धाव घेत अप्रतिम झेल टिपला. पुढच्याच षटकात हर्षल पटेलने श्रीलंकेला मोठा धक्का दिला अन् कुसल २८ धावांवर बाद झाला. पटेलच्या षटकात भानुका राजपक्षाचा ( १०) झेल हार्दिकने टिपला, परंतु त्याच्या पाय मुरगळला आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले. सूर्यकुमार यादव नेतृत्व करताना दिसला. १५व्या षटकात हार्दिक पुन्हा मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी आला. शिवम मावीच्या गोलंदाजीवर हार्दिकने श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगाचा ( २१) झेलही टिपला.
दासून शनाका दमदार फटकेबाजी करत होता आणि वानखेडे स्टेडियमवर स्मशान शांतता पसरली होती. श्रीलंकेला २१ चेंडूंत ३४ धावा हव्या होत्या आणि शनाका चांगला खेळत होता. उम्रान मलिकने १७व्या षटकात भारताला ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली. २७ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४५ धावा करणारा शनाकाला चहलच्या हाती झेल देऊन माघारी फिरावे लागले. उम्रानने २७ धावा देत २ विकेट्स घेतल्या. शिवमने पदार्पणाच्या सामन्यात २२ धावांत ४ विकेट्स घेत प्रभाव पाडला. प्रग्यान ओझा ( ४/२१) आणि बरींदर सरन ( ४/१०) यांनी अनुक्रमे २००९ व २०१६ मध्ये पदार्पणात ट्वेंटी-२०त चार विकेट्स घेतल्या होत्या.
श्रीलंकेच्या चमिका करुणारत्नेने अखेरपर्यंत संघर्ष केला. हर्षल पटेलने टाकलेल्या १९व्या षटकात १३ धावा आल्या अन् श्रीलंकेला ६ चेंडूंत विजयासाठी १३ धावा करायच्या होत्या. अक्षर पटेलला अखेरचे षटक दिले अन् पहिल्या दोन चेंडूवर दोन धावा आल्यानंतर तिसरा चेंडू सीमापार पाठवला. करुणारत्नेला ३ चेंडूंत ५ धावा करायच्या होत्या. १ चेंडूंत ४ धावा असा सामना आला अन् करुणारत्नेच स्ट्राईकवर होता. पण, तो अपयशी ठरला अन् भारताने २ धावांनी सामना जिंकला. श्रीलंकेचा संघ १६० धावांत तंबूत परतला. करुणारत्ने १६ चेंडूंत २३ धावांवर नाबाद राहिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"