India vs Sri Lanka 1st T20I Live Updates : श्रीलंकेच्या गोलंदाजांनी वानखेडे स्टेडियमवर उत्तम गोलंदाजी करताना भारताच्या धावांवर चाप लावला होता. इशान किशन, हार्दिक पांड्या यांनी चांगला खेळ करताना ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना फार काळ खेळपट्टीवर तग धरता आला नाही. दीपक हुडाने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करून भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. अक्षर पटेलनेही हुडाला दमदार साथ दिली. भारताच्या गोलंदाजांनीही उल्लेखनीय कामगिरी करताना श्रीलंकेला बॅकफूटवर फेकले आहे. त्यात इशान किशनने घेतला अविश्वसनीय कॅच सर्वांचे मन जिंकणारा ठरला.
श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इशान किशनने पहिल्याच षटकात १७ धावा चोपल्या. पदार्पणवीर गिलने दुसऱ्या षटकात चौकाराने खाते उघडले. पण, गिल ( ७) व सूर्यकुमार यादव ( ७) हे झटपट माघारी परतले. संजू सॅमसनही ५ धावांवर माघारी परतला. इशानची फटकेबाजी सुरूच होती आणि कर्णधार हार्दिक पांड्यासह त्याने ३१ धावांची भागीदारीही केली. पण, वनिंदू हसरंगाने त्याला फिरकीच्या जाळ्यात ओढले अन् इशानला ३७ धावांवर ( ३ चौकार व २ षटकार) माघारी जावे लागले.
हार्दिकवरच आता पूर्ण मदार होती, परंतु श्रीलंकेच्या गोलंदाजांनी धावांवर लगाम लावली होती. दडपणाखाली असलेल्या हार्दिकची १५व्या षटकात विकेट मिळाली. दिलशान मधुशंकाच्या चेंडूवर कट मारण्याचा हार्दिकचा प्रयत्न फसला अन् २९ धावांवर यष्टीरक्षकाच्या हाती तो झेल देऊन माघारी परतला. १६व्या षटकात दीपक हुडाने गिअर बदलला अन् थिक्सानाला सलग दोन षटकार खेचून चाहत्यांमध्ये ऊर्जा फुंकली. दीपक हुडा व अक्षर पटेल यांनी अखेरच्या पाच षटकांत फटकेबाजी केली. अक्षरने २० चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद ३१ धावा केल्या, तर दीपकने २३ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारासह नाबाद ४१ धावा केल्या. या दोघांनी ३५ चेंडूंत ६८ धावांची भागीदारी केली आणि भारताने ५ बाद १६२ धावांपर्यंत मजल मारली.