India vs Sri Lanka, 1st Test Day 2 Live Updates : भारतीय संघाने पहिल्या कसोटीत वर्चस्व गाजवले आहे. पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केल्यानंतर श्रीलंकेचे दिवसअखेर ४ फलंदाज १०८ धावांवर माघारी परतले आहेत. श्रीलंका अजूनही ४६६ धावांनी पिछाडीवर आहेत. या सामन्यात रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याने नाबाद १७५ धावांची खेळी साकारली. जडेजा द्विशतकाच्या उंबरठ्यावर असूनही कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) डाव घोषित केल्यामुळे त्याच्यावर व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) यांच्यावर टीका झाली. सचिन तेंडुलकर १९४ धावांवर असताना द्रविड कर्णधार होता आणि त्याने डाव घोषित केला होता. तो प्रसंग ताजा झाला. पण, यावर जडेजानेच पडदा टाकला.
पहिल्या दिवसाचा खेळ रिषभ पंतने गाजवला. त्याच्या ९६ धावांची भारताला मजबूत स्थितीत आणले. मयांक अग्रवाल ( ३३), रोहित शर्मा ( २९), हनुमा विहारी ( ५८), विराट कोहली ( ४५), श्रेयस अय्यर ( २७) यांचेही योगदान होतेच. दुसऱ्या दिवसाचा खेळ जडेजाच्या नावावर राहिला. त्याने आणि आर अश्विनने ७व्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली. अश्विन ६१ धावांवर माघारी परतल्यानंतर ९व्या विकेटसाठी मोहम्मद शमीसह शतकी भागीदारी केली. भारताने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला. जडेजा २२८ चेंडूंवर १७ चौकार व ३ षटकारांसह १७५ धावांवर नाबाद राहिला आणि शमीसह ( २०*) त्याने ९व्या विकेटसाठी ९४ चेंडूंत १०३ धावा जोडल्या.
प्रत्युत्तरात कर्णधार दिमुथ करूणारत्ने व लाहिरू थिरिमाने यांनी चांगली सुरूवात केली. पण, आर अश्विनच्या जाळ्यात लाहिरू ( १७) अडकला. त्यानंतर जडेजाने करुणारत्नेला ( २८) पायचीत करून श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. जसप्रीत बुमराहने अनुभवी मॅथ्यूजला ( २२) पायचीत पकडले. आर अश्विनने दुसरा धक्का देताना धनंजया डी सिल्वाला ( १) LBW केले.
रवींद्र जडेजाची खिलाडूवृत्तीजडेजा म्हणाला, मी संघाला डाव घोषित करण्यास सांगितले, कारण श्रीलंकेचे खेळाडू खूप दमले होते आणि त्यांना बाद करण्याची चांगली संधी आपल्याकडे आहे. रोहित शर्माने कुलदीपकडे माझ्यासाठी एक मॅसेज पाठवला. तो म्हणालेला २०० धावा कर त्यानंतर आम्ही डाव घोषित करतो, परंतु मी त्याच्या द्विशतकाचा सल्ला मानला नाही. आता दमलेल्या श्रीलंकन फलंदाजांना खेळायला बोलावले तर आपल्याला विकेट घेता येतील, असे मी त्याला सांगितले.