India vs Sri Lanka, 1st Test Day 2 Live Updates : भारतीय संघाने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित करून श्रीलंकेला बॅकफूटवर फेकले. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याने नाबाद १७५ धावांची खेळी साकारली. रिषभ पंतचे शतक हुकल्याने निराश झालेल्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर जडेजाने हास्य फुलवले. जडेजाने आर अश्विन व मोहम्मद शमी यांच्यासह ८ व्या व ९व्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. जडेजाने या विक्रमी खेळीत कपिल देव ( Kapil Dev) यांचा १९८६ सालचा विक्रम मोडला अन् असे अनेक पराक्रम केले.
पहिल्या दिवसाचा खेळ रिषभ पंतने गाजवला. त्याच्या ९६ धावांची भारताला मजबूत स्थितीत आणले. मयांक अग्रवाल ( ३३), रोहित शर्मा ( २९), हनुमा विहारी ( ५८), विराट कोहली ( ४५), श्रेयस अय्यर ( २७) यांचेही योगदान होतेच. दुसऱ्या दिवसाचा खेळ जडेजाच्या नावावर राहिला. त्याने आणि आर अश्विनने ७व्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली. अश्विन ६१ धावांवर माघारी परतल्यानंतर ९व्या विकेटसाठी मोहम्मद शमीसह शतकी भागीदारी केली. भारताने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला. जडेजा २२८ चेंडूंवर १७ चौकार व ३ षटकारांसह १७५ धावांवर नाबाद राहिला आणि शमीसह ( २०*) त्याने ९व्या विकेटसाठी ९४ चेंडूंत १०३ धावा जोडल्या.
मोहालीतील कसोटी क्रिकेटमधील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. याआधी भारताने २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ५१६ धावा केल्या होत्या. त्याआधी १९९७मध्ये श्रीलंकेविरुद्ध ९ बाद ५१५ ( डाव घोषित), १९९९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ३ बाद ५०५ ( डाव घोषित) आणि २०१३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४९९ धावा केल्या होत्या.
पाहा जडेजाच्या इनिंग्जचे हायलाईट्स
रवींद्र जडेजाने नोंदवलेले विक्रम
- कसोटी क्रिकेटमध्ये २००+ विकेट्स व १५० + धावा करणारे दोनच खेळाडू आहेत आणि ते म्हणजे कपिल देव व रवींद्र जडेजा. सर जडेजाने ९व्या विकेटसाठी मोहम्मद शमीसह शतकी भागीदारी केली.
- कसोटी क्रिकेटमध्ये ७व्या क्रमांकावर शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय ठरला. याआधी कपिल देव यांनी १९८६मध्ये कानपूर कसोटीत १६३ धावा, महेंद्रसिंग धोनीने २००९ साली अहमदाबाद व मुंबई येथे अनुक्रमे ११० व १००* धावा केल्या होत्या.
- रवींद्र जडेजाने १७५ धावा करून कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडला. भारताकडून ७ किंवा त्याच्या खालच्या क्रमांकावरील ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. कपिल देव यांनी १९८६ मध्ये श्रीलंकेविरुद्ध १६३ धावा केल्या होत्या.
- कपिल देव यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५००० + धावा आणि ४००+ विकेट्स घेणारा रवींद्र जडेजा हा दुसरा भारतीय ठरला. जडेजाने कसोटीत २१९५ धावा व २३२ विकेट्स, वन डेत २४११ धावा व १८८ विकेट्स आणि ट्वेंटी-२०त ३२६ धावा व २८ विकेट्स घेतल्या आहेत. कपिल देव यांनी १३१ कसोटीत ५२४८ धावा व ४३४ विकेट्स आणि २२५ वन डेत ३७८३ धावा व २५३ विकेट्स घेतल्या आहेत.