India vs Sri Lanka, 1st Test Day 2 Live Updates : भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीत यजमान भारताचे निर्विवाद वर्चस्व गाजवलेलं पाहायला मिळत आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) सातव्या विकेटसाठी आर अश्विनसह शतकी भागीदारी केली. या दोघांच्या संयमी खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवले. आर अश्विन अर्धशतकानंतर माघारी परतला, परंतु जडेजाने पुढच्याच षटकात शतक झळकावले. यावेळी ज्याने त्याला Rockstar हे नाव दिले त्या शेन वॉर्नला ( Shane Warne) आठवून तो भावूक झाला. २००८च्या आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्सने जेतेपद पटकावले होते आणि तेव्हा शेन वॉर्न हा संघाचा कर्णधार होता. तेव्हा जडेजा RRचा सदस्य होता आणि वॉर्नने त्याला 'Rockstar' हे टोपणनाव दिले होते.
रोहित व मयांक अग्रवाल यांनी अर्धशतकी भागीदारी केली. विराट कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी हनुमा विहारीसह १५५ चेंडूंत ९० धावा जोडल्या. विराट ४५ धावांवर, तर विहारी ५८ धावांवर बाद झाला. त्यानंतर रिषभ पंतने व श्रेयस अय्यरसह ८८ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी केली. श्रेयस २७ धावांवर LBW झाला. रिषभ ९७ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ९६ धावांवर माघारी पतला आणि जडेजासह त्याची १०४ ( ११८ चेंडू) धावांची भागीदारीही संपुष्टात आली. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने अर्धशतक झळकावताना आर अश्विनसह ७व्या विकेटसाठी शतकी भागीदारी पूर्ण केली.
जडेजा व अश्विन ही सेट झालेली जोडी श्रीलंकेसाठी डोकेदुखी ठरली होती. त्यांनी सातव्या विकेटसाठी १३० धावा जोडून संघाला ४५0+ पार पल्ला गाठून दिला. पण, लकमलने ही भागीदारी संपुष्टात आली. त्याने टाकलेल्या पहिल्या बाऊन्सरवर अश्विनने चौकार खेचला, परंतु लकमने पुन्हा तसाच चेंडू टाकला आणि यावेळेस अश्विन फसला. चेंडू बॅटची किनार घेत यष्टिरक्षकाच्या हाती विसावला. अश्विन ८२ चेंडूंत ८ चौकारांसह ६१ धावांवर बाद झाला. जडेजाने १६६ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या. कसोटीतील त्याचे हे दुसरे शतक ठरले. त्याने या शतकाचे सेलिब्रेशन नेहमीच्या शैलीत केले, परंतु यावेळेस त्याने आकाशाकडे पाहत शेन वॉर्नची आठवण काढली.
कसोटी क्रिकेटमध्ये ७व्या क्रमांकावर शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय ठरला. याआधी कपिल देव यांनी १९८६मध्ये कानपूर कसोटीत १६३ धावा, महेंद्रसिंग धोनीने २००९ साली अहमदाबाद व मुंबई येथे अनुक्रमे ११० व १००* धावा केल्या होत्या.