IND vs SL, 1st Test Day 3 Live Updates : सर रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीत निर्विवाद वर्चस्व गाजवले. नाबाद १७५ धावांच्या खेळीनंतर अष्टपैलू जडेजाने गोलंदाजीतही अविश्वसनीय कामगिरी केली. विराट कोहलीची ( Virat Kohli) १००वी कसोटी आणि कर्णधार म्हणून रोहित शर्माची ( Rohit Sharma) पहिली कसोटी Rockstar Ravindra Jadejaने अविस्मरणीय बनवली. भारतीय संघाने तीन दिवसांत एक डाव व २२२ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. नाबाद १७५ धावा आणि ९ विकेट्स घेणारा रवींद्र जडेजा या विजयाचा नायक ठरला. दुसऱ्या डावात आर अश्विनने ४ विकेट्स घेतल्या.
श्रीलंकेच्या फलंदाजांकडून फार संघर्ष पाहायला मिळाला नाही. कर्णधार रोहित शर्माने आक्रमक क्षेत्ररक्षण लावताना श्रीलंकेच्या फलंदाजांना चूका करण्यास भाग पाडले. प्रत्येक गोलंदाजासाठी रोहितने अचूक क्षेत्ररक्षण लावले होते आणि हे पाहून महान फलंदाज सुनील गावस्कर यांनीही कौतुक केले. श्रीलंकेचा पथूम निसंका ( नाबाद ६१) वगळल्यास कर्णधार दिमूथ करुणारत्न ( २८), चरिथ असलंका ( २९) व अँजेलो मॅथ्यूज ( २२) हे लंकेकडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले. जसप्रीत बुमराह व आर अश्विन यांनी प्रत्येकी दोन, तर मोहम्मद शमीने एक विकेट घेतली. रवींद्र जडेजाने ४१ धावांत ५ फलंदाज बाद केले. भारताने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव १७४ धावांवर गुंडाळून टीम इंडियाने त्यांना फॉलोऑन दिला.
निरोशान डिकवेलाने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली होती. लसिथ इम्बुल्डेनियासोबत त्याने श्रीलंकेचा पराभव टाळण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते. पण, जडेजाने पुन्हा कमाल केली आणि त्याने लसिथला बाद केले. मोहम्मद शमीने ९वी विकेट घेताना विश्व फर्नांडोला ( ०) बाद केले. अश्विनने अखेरची विकेट घेताना श्रीलंकेचा दुसरा डाव १७८ धावांवर गुंडाळाला. डिकवेला ५१ धावांवर नाबाद राहिला.