India vs Sri Lanka, 1st Test Day 3 Live Updates : रोहित शर्माची परफेक्ट फिल्ड प्लेसमेंट आणि गोलंदाजांचा अचूक मारा, याच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवशी फलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या रवींद्र जडेजाने आज गोलंदाजीने श्रीलंकेला हैराण केले. रोहितने परिस्थितीनुसार गोलंदाजीत केलेले बदल यशस्वी ठरले. महान फलंदाज सुनील गावस्कर यांनीही रोहितच्या क्षेत्ररक्षणाच्या रणनीतीचे कौतुक केले. जडेजाने पाच विकेट्स घेत भारताला मोठी आघाडी मिळवून दिली.
मयांक अग्रवाल ( ३३), रोहित शर्मा ( २९), हनुमा विहारी ( ५८), विराट कोहली ( ४५), श्रेयस अय्यर ( २७) व रिषभ पंत ( ९६) यांच्या योगदानानंतर रवींद्र जडेजाची बॅट तळपली. त्याने आणि आर अश्विनने ७व्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली. अश्विन ६१ धावांवर माघारी परतल्यानंतर ९व्या विकेटसाठी मोहम्मद शमीसह शतकी भागीदारी केली. भारताने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला. जडेजा २२८ चेंडूंवर १७ चौकार व ३ षटकारांसह १७५ धावांवर नाबाद राहिला आणि शमीसह ( २०*) त्याने ९व्या विकेटसाठी ९४ चेंडूंत १०३ धावा जोडल्या.
प्रत्युत्तरात कर्णधार दिमुथ करूणारत्ने व लाहिरू थिरिमाने यांनी चांगली सुरूवात केली. पण, आर अश्विनच्या जाळ्यात लाहिरू ( १७) अडकला. त्यानंतर जडेजाने करुणारत्नेला ( २८) पायचीत करून श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. जसप्रीत बुमराहने अनुभवी मॅथ्यूजला ( २२) पायचीत पकडले. आर अश्विनने दुसरा धक्का देताना धनंजया डी सिल्वाला ( १) LBW केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा चरिथ असालंका व पथूम निसंका यांनी भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली. ट्वेंटी-२० मालिकेत फॉर्मात असलेल्या पथूमने कसोटीत अर्धशतक पूर्ण केली. ही सेट झालेली जोडी जसप्रीत बुमराहने तोडली. जसप्रीतने चेंडूचा वेग कमी करून चरिथला चकवले आणि तो पायचीत झाला. चरिथ ( २९) धावांवर माघारी परतल्यामुळे पथूमसह ५८ धावांची भागीदारीही संपुष्टात आली.
कर्णधार रोहितने गोलंदाजीसाठी रवींद्र जडेजाला बोलावले आणि आक्रमक फिल्ड सेटिंग लावली. त्याचा फायदा झालेला दिसला. जडेजाने ६१व्या षटकात निरोशान डिकवेला ( २) व सुरंगा लकमल ( ०) यांना बाद करून श्रीलंकेला ७वा धक्का दिला. त्यानंतर मोहम्मद शमीने लंकेच्या लसिथ इम्बुलडेनियाला (०) बाद केले. एका बाजूने पथूम खिंड लढवत होता, परंतु समोरच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाज टिकूच देत नव्हते. जडेजाने आणखी एक विकेट घेत श्रीलंकेचा ९वा फलंदाज माघारी पाठवला. त्याच षटकात आणखी एक विकेट घेत जडेजाने कमाल केली. श्रीलंकेचा पहिला डाव १७४ धावांत गुंडाळला. जडेजाने ४१ धावांत ५ विकेट्स घेतल्या. डावखुऱ्या फिरकीपटू जडेजाने आठव्यांदा डावात पाच विकेट्स घेत बिशन सिंग बेदी यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.