India vs Sri Lanka, 1st Test Live Update : ट्वेंटी-२० मालिकेत सपाटून मार खाल्ल्यानंतर श्रीलंकेचा संघ कसोटी मालिकेत भारताला कडवी टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत-श्रीलंका ( India vs Sri lanka) यांच्यातली पहिली कसोटी शुक्रवारपासून मोहाली येथे खेळवण्यात येणार आहे. पण, या कसोटीपूर्वीच श्रीलंकेला धक्का बसला आहे. श्रीलंकेचा फलंदाज कुशल मेंडिस ( Kusal Mendis) याच्या मांडीचे स्नायू ताणले गेले आहेत आणि तो पहिल्या कसोटीत खेळणार नसल्याचे कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने सांगितले. दरम्यान, यष्टिरक्षक-फलंदाज निरोशान डिकवेला याचे एका वर्षाच्या बंदीनंतर संघात पुनरागमन होत आहे.
मागच्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर असताना डिकवेला आणि मेंडिस या दोघांनी बायो-बबल नियमांचे उल्लंघन केले होते आणि त्यांच्यावर १२ महिन्यांची बंदी घातली गेली होती. भारताविरुद्धच्या मालिकेत मेंडिसचा संघात समावेश करण्यात आला, परंतु तंदुरुस्तीच्या चाचणीनंतर त्याला ग्रीन सिग्नल मिळणार होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात त्याच्या मांडिचे स्नायू ताणले गेले होते. त्यामुळेच त्याला भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत खेळता आले नव्हते. ''डिकवेला यष्टिंमागे दिसेल, गोलंदाज दुश्मंता चमिरा याला विश्रांती देण्यात आली असून तो पिंक बॉल कसोटीत खेळेले. मेंडिसने दुखापतीमुळे माघार घेतली आहे,''असे करुणारत्नेने सांगितले.
मोहाली कसोटीत रोहित शर्मा ( Rohit Sharma) टीम इंडियाचा कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे, तर विराट कोहलीचा हा १०० वा कसोटी सामना आहे. त्याशिवाय करुणारत्नेसाठी ही कसोटी खास असणार आहे. श्रीलंकेचा हा ३००वा कसोटी सामना आहे आणि त्यात करुणारत्नेला नेतृत्व करण्याचा मान मिळाला आहे. ''देशाच्या ३००व्या कसोटीत नेतृत्व करणे हे माझे सौभाग्य आहे. मी कधी याचा विचार केला नव्हता. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या ऐतिहासिक क्षण अविस्मरणीय करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन,'' असे करुणारत्नेनं सांगितले.
श्रीलंकेचा कसोटी संघ : दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), पाथुम निसंका, लाहिरू थिरिमने, धनंजया डी सिल्वा (उपकर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, चारिथ असलंका, निरोशन डिक्वेल्ला, चमिका करुणारत्ने, लाहिरु कुमारा, सुरंगा लकमल, दुष्मंथा चमीरा, विश्वा फर्नांडो, जेफ्री वँडरसे, प्रवीण जयविक्रमे, लसिथ एम्बुल्डेनिया