Join us  

Gautam Gambhir on Ravindra Jadeja, IND vs SL 1st Test: "त्या' ४०-५० धावाही रविंद्र जाडेजाच्या १७५ धावांपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत, त्याची खेळी सर्वोत्तम नव्हती"; गौतम गंभीरचं अजब वक्तव्य

१७५ धावा आणि ९ बळी टिपणारा रविंद्र जाडेजा ठरला सामनावीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 11:57 AM

Open in App

Gautam Gambhir on Ravindra Jadeja, IND vs SL 1st Test : भारतीय संघाने रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या नेतृत्वाखाली पहिलीच कसोटी एक डाव आणि २२२ धावांनी जिंकली. अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा याने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या खेळाडूंची चांगलीच तारांबळ उडवली. पहिल्या डावात जाडेजाने तब्बल १७ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद १७५ धावा कुटल्या. तर श्रीलंकेच्या दोन्ही डावात मिळून ९ बळीदेखील टिपले. जाडेजाच्या या दुहेरी यशाबद्दल त्याला सामनावीराचा किताब देऊन गौरविण्यात आले. त्याच्या खेळीचं आजी-माजी क्रिकेटपटूंनी तसेच क्रिकेट जाणकारांनीही जोरदार कौतुक केलं. पण माजी सलामीवीर गौतम गंभीर हा मात्र जाडेजाच्या धमाकेदार फलंदाजीबाबत समाधानी नसल्याचं दिसून आलं.

एका शो मध्ये त्याला विचारण्यात आले की जाडेजाने लगावलेल्या १७५ धावा ही त्याची क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी म्हणता येऊ शकते का? त्यावर गौतम गंभीर म्हणाला, 'मला तरी वाटतं की असं म्हणता येणार नाही. माझ्या मते रविंद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर जी खेळी केली होती किंवा त्याने भारताबाहेर ज्या खेळी केल्या आहेत, त्या खेळींमुळे त्याला जास्त आत्मविश्वास मिळेल. आकडेवारी कधीकधी धोकाही देऊ शकते. पण आपल्या सोयीच्या ठिकाणांपासून दूर जाऊन चांगली खेळी करणं हे जास्त चांगलं आणि आत्मविश्वास देणारं असतं."

"जाडेजाच्या फलंदाजीच्या वेळी एक गोष्ट सगळ्यांनाच जाणवली असेल की शतक झाल्यानंतर तो फक्त फटकेबाजी करत होता आणि त्याला धावा मिळत गेल्या. धनंजया डी सिल्वा, असालांका आणि एम्बुल्डेनिया हे तिघे गोलंदाजी करत होते पण त्यांचा फारसा प्रभाव पडताना दिसत नव्हता. पण दुसऱ्या अर्थी जर विचार केलात तर ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड यांच्या भूमिवरील ४०-५० धावांचं योगदान हे जाडेजाच्या या खेळीपेक्षा महत्त्वाचं असू शकतं", असंही गंभीर म्हणाला.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकागौतम गंभीररवींद्र जडेजारोहित शर्मा
Open in App