India vs Sri Lanka, 1st Test Live Updates : फॉरमॅट कोणताही असो आपला फलंदाजी करण्याचा थाट तोच असेल, हे रिषभ पंतने ( Rishabh Pant) पुन्हा एकदा दाखवून दिले. भारत-श्रीलंका ( India vs Sri Lanka Test Day 2) यांच्यातल्या कसोटीत पहिल्या ५० धावांसाठी ७५ चेंडू खेळल्यानंतर रिषभने पुढील ४६ धावा या अवघ्या २० चेंडूंत चोपल्या. पण, शतकाच्या उंबरठ्यावर येऊन बाद होण्याचे सत्र याही सामन्यात कायम राहिले. मायदेशात चौथ्यांदा त्याला शतकाने हुलकावणी दिली. पण, पहिल्या दिवसाच्या त्याच्या ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने दिवसअखेर ६ बाद ३ ५७ धावांपर्यंत मजल मारली.
रोहित व मयांक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी दिली. पण, या दोघांना मोठी खेळी साकारता आली नाही. विराट कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी हनुमा विहारीसह १५५ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली. विराट ७६ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ४५ धावांवर बाद झाला. विहारीने १२८ चेंडूंत ५ चौकारांसह ५८ धावा केल्या. रिषभ व फॉर्मात असलेल्या श्रेयसने ८८ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी केली. श्रेयस २७ धावांवर LBW झाला. रिषभ ९७ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ९६ धावांवर माघारी पतला आणि जडेजासह त्याची १०४ ( ११८ चेंडू) धावांची भागीदारीही संपुष्टात आली.
भारतात त्याची चार शतकं हुकली. तो ९१, ९२, ९२ आणि ९६ धावांवर बाद झाला. एकूण पाचवेळा तो नव्हर्स ९०वर बाद झाला आहे आणि त्याने महेंद्रसिंग धोनीच्या कसोटीत ५ वेळा नव्हर्स ९०च्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली. सुरंगा लकमलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाल्यानंतर रिषभ मैदानावरच हताश होऊन काही काळ बसला. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्याचे मनोधैर्य वाढवले, ड्रेसिंग रुममध्ये जाताना संघातील प्रत्येक खेळाडू उभं राहून त्याचं कौतुक करत होता. पण, त्यानंतर रिषभ कर्णधार रोहितच्या शेजारी जाऊन बसला. त्याचं मन दाटून आलं होतं, डोळे पाणावले होते. तो कोणत्याही क्षणी रडेल असेच वाटत होते, परंतु त्याने स्वतःला आवरले.
Web Title: IND vs SL, 1st Test Live Updates : Rishabh Pant was heartbroken and was crying after missing out his 100 by just 4 runs, Watch video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.