Rohit Sharma in Press Conference India vs Sri Lanka 1st Test Live Update : रोहित शर्मा प्रथमच भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारत प्रथमच कसोटी सामना खेळणार आहे आणि माजी कर्णधार विराट कोहलीचा ( Virat Kohli) हा १०० वा कसोटी सामना आहे. त्यामुळे विराटचा १०० व कसोटी कर्णधार म्हणून पहिला सामना अविस्मरणीय करण्यासाठी रोहित सज्ज झाला आहे. पण, या गोष्टीचे दडपण न घेता रोहित नेहमीच्या मूडमध्ये दिसला. त्याने एका प्रश्नावर मजेशीर उत्तर दिले.
पाहा व्हिडीओ...
अजिंक्य - चेतेश्वर यांच्या जागी कोण?अजिंक्य व चेतेश्वर यांच्या जागी अंतिम ११ मध्ये शुबमन गिल व हनुमा विहारी ही दोन नावं चर्चेत आहेत. फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यर हाही शर्यतीत आहे. पण, रोहितने यापैकी नेमकी कोणाला संधी मिळेल, हे सांगितले नाही. तो म्हणाला,''अजिंक्य आणि चेतेश्वर यांच्या जागी ज्याला कुणाला संधी मिळेल, ती त्याच्यासाठी नवी सुरुवात असेल. या अनुभवी खेळाडूंची जागा भरून काढणे सोपी गोष्ट नाही. सलामीला कोण खेळेल, याबाबतही ठरवलेलं नाही. सामन्याआधी त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. विहारी, मयांक, शुबमन आणि श्रेयस यांना आम्हा सर्वांकडून पूर्णपणे पाठिंबा आहे.''
एक अतिरिक्त फिरकीपटूला खेळवणार?मोहालीची खेळपट्टी आधीसारखीच आहे. खेळपट्टी ड्राय दिसतेय, परंतु ही टिपिकल भारतीय खेळपट्टी आहे आणि येथे फिरकीला साथ नक्की मिळेल.
विराट कोहलीची १०० वी कसोटी हा अविस्मरणीय प्रवास आहे आणि तितकाच दीर्घ प्रवास आहे. क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये त्याने अविश्वसनीय कामगिरी केली आहे. त्याला कसोटी क्रिकेट खेळताना पाहणे, नेहमी सुखावणारे आहे. त्याची ही कसोटी आम्ही खास बनवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आशा करूयात की कसोटीचे पाच दिवस आमच्यासाठी चांगले जातील, असे रोहित म्हणाला. त्याने पुढे सांगितले की,ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका विजय अविस्मरणीय होता आणि तो विराटच्या नेतृत्वाखाली मिळवला. २०१३मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झळकावलेले शतक हे दर्जेदार होते. त्या खेळपट्टीवर खेळणे आव्हानात्मक होते आणि डेल स्टेनसारख्या गोलंदाजाचा सामना करणे सोपे नव्हते.