India vs Sri Lanka, 1st Test Live Updates : भारत-श्रीलंका यांच्यातील मोहाली कसोटी ही माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) या दोघांसाठी खास आहे. विराटचा हा १०० वा कसोटी सामना आहे, तर कर्णधार म्हणून रोहितचा हा पहिलाच कसोटी सामना आहे. त्यामुळे हे क्षण अविस्मरणीय करण्यासाठी दोघं व टीम इंडियाचे सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत. अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या दोन अनुभवी खेळाडूंशिवाय ११ वर्षांनी प्रथमच टीम इंडिया कसोटी क्रिकेट खेळणार आहे. शुबमन गिल, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी यांच्यावरील जबाबदारी त्यामुळे अधिक वाढली आहे.
२००८मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदापर्ण करणाऱ्या विराटला कसोटी पदार्पणासाठी २०११ची प्रतीक्षा पाहावी लागली. त्याने ९९ कसोटीत ५०.३९च्या सरासरीने ७९६२ धावा केल्या आहेत. त्यात २७ शतकं व२८ अर्धशतकांचा समावेश असून नाबाद २५४ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. कसोटीत त्याच्या नावावर १०० झेल आहेत, शिवाय २४ षटकात व ८९६ चौकारही आहेत.
भारताकडून १०० कसोटी खेळलेले खेळाडू
- सुनील गावस्कर ( १९८४)
- दीलीप वेंगसरकर ( १९८८)
- कपिल देव ( १९८९)
- सचिन तेंडुलकर ( २००२)
- अनिल कुंबळे ( २००५)
- राहुल द्रविड ( २००६)
- सौरव गांगुली ( २००७)
- व्ही व्ही एस लक्ष्मण ( २००८)
- वीरेंद्र सेहवाग ( २०१२)
- हरभजन सिंग ( २०१३)
- इशांत शर्मा ( २०२१)
- विराट कोहली ( २०२२)
भारतासाठी २५० वन डे व १०० कसोटी खेळणारे चार खेळाडू आहेत आणि त्यात आज विराटचा समावेश झाला. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि अनिल कुंबळे यांच्यानंतर भारताकडून २५० वन डे व १०० कसोटी खेळणाऱ्या यादीत विराट कोहलीचे नाव लिहिले गेले आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला आहे. भारतीय संघ तीन फिरकीपटू, दोन जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरणार आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, जयंत यादव