Team India Playing XI, IND vs SL 1st Test: कर्णधार Rohit Sharma याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उद्यापासून मोहालीच्या मैदानावर कसोटी सामना खेळणार आहे. ही मालिका दोन सामन्यांची असून दुसरा सामना बंगळुरूच्या मैदानात डे-नाईट पद्धतीने खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना दोन कारणांसाठी महत्त्वाचा आहे. माजी कर्णधार विराट कोहली याचा हा १००वा कसोटी सामना आहे. त्यामुळे त्याच्याकडे साऱ्यांच्या नजरा असणार आहेत. तर दुसरीकडे रोहित शर्मा याचा हा कसोटी कर्णधार म्हणून पहिलाच सामना असणार आहे. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाचं Playing XI कसं असेल, याबाबत विविध अंदाज वर्तवण्यात येत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने त्याच्या पसंतीचा संघ जाहीर केला आहे.
भारताच्या संघात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे दोन अनुभवी खेळाडू समाविष्ट नाहीत. आकाश चोप्राने पहिल्या कसोटीसाठी सलामीला कर्णधार रोहित शर्मासोबत मयंक अग्रवालला संधी दिली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरला स्थान दिले आहे. त्यामुळे शुबमन गिलला संघात जागा देण्यात आलेली नाही. चौथ्या क्रमांकासाठी विराट कोहली तर अजिंक्य रहाणेच्या जागी हनुमा विहारीला त्याने पसंती दर्शवली आहे.
टी२० मालिकेसाठी विश्रांती घेतलेला ऋषभ पंत संघात परत आला आहे. तसेच रविंद्र जाडेजाचेही कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे या दोघांना सहाव्या आणि सातव्या स्थानी फलंदाजीची संधी आकाश चोप्राच्या संघात देण्यात आली आहे. आठव्या स्थानी रविचंद्रन अश्विन आणि जयंत यादव यांच्यापैकी एका ऑफस्पिनरला संघात घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
वेगवान गोलंदाजीचा विचार करता जसप्रीत बुमराह हा संघात असणं स्वाभाविकच आहे. संघाचा उपकर्णधार असल्याने त्याच्यावर विशेष जबाबदारी असणार आहे. बुमराहला साथ देण्यासाठी मोहम्मद शमीला संघात स्थान मिळणं जवळपास निश्चित आहे. तसेच, या दोघांसोबतच आणखी एक वेगवान गोलंदाज म्हणून सिराजला संघात पाहता येईल, असा अंदाज आकाश चोप्राने व्यक्त केला आहे.
आकाश चोप्राने निवडलेलं Playing XI - रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, विराट कोहली, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा, रवि अश्विन किंवा जयंत यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
Web Title: IND vs SL 1st Test Team India Playing XI former cricketer predicts team but excludes Shubman Gill Virat Kohli 100th Test Rohit Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.