Ashish Nehra on Gautam Gambhir Rohit Sharma Virat Kohli, IND vs SL: रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर यांसारख्या खेळाडूंचा भरणा असलेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंकेने पहिला सामना बरोबरीत सोडवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात ३२ धावांनी विजय मिळवला. भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकन फलंदाजांना बांधून ठेवले. पण भारतीय फलंदाजांनी मात्र निराशा केली. पहिल्या सामन्याप्रमाणेच दुसऱ्या सामन्यातही धडाकेबाज सलामीनंतर भारताचे फलंदाज ढेपाळले. या पराभवानंतर भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहरा याने नवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबाबत रोखठोक विधान केले. तसेच, रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबतही सूचक भाष्य केले.
"भारताची पुढची वनडे मालिका २-३ महिन्यानंतर आहे. ही गोष्ट थोडीशी दुर्मिळ मानावी लागेल. अशा परिस्थितीत रोहित आणि विराट या दोघांना विश्रांती देऊन नव्या खेळाडूंना या मालिकेत संधी देता आली असती. गंभीर हा नवा कोच आहे, त्याला संघातील वरिष्ठ खेळाडूंसोबत क्रिकेट मालिका खेळण्याची इच्छा असणार हे मला मान्य आहे. पण गंभीर हा परदेशी कोच नाही. तो या दोनही खेळाडूंना आधीपासून ओळखतो. त्यामुळे त्याने विराट-रोहितला खेळवायची घाई करायला नको होती," असे रोखठोक विधान नेहराने व्यक्त केले.
"परदेशी कोच हे भारतीय खेळाडूंना फारसे ओळखत नसतात. त्यामुळे संघातील खेळाडूंसोबत मैत्री होण्यासाठी ते वरिष्ठ खेळाडूंचा आधार घेतात. गंभीर मात्र भारतीयच आहे. तो रोहित, कोहली आणि इतर खेळाडूंनाही ओळखतो. त्यामुळे नवनव्या खेळाडूंना संधी देणे आणि आजमावून पाहण्याची गंभीरकडे सुवर्णसंधी आहे. जेव्हा मायदेशातील क्रिकेट मालिका सुरु होतील तेव्हा रोहित-विराटला खेळवता येऊ शकते. मी असे म्हणणार नाही की सध्या गंभीर जे करतोय ते चूक आहे. पण सध्याच्या सीरिजमध्ये वेगळ्या पद्धतीच्या रणनितीने मैदानात उतरता येऊ शकले असते," असे नेहराने सुचवले.
Web Title: IND vs SL 2nd ODI Ashish Nehra reaction on Gautam Gambhir Rohit Sharma Virat Kohli after Team India loss
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.