India vs Sri Lanka, 2nd ODI Live: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी बुधवारी आपला पन्नासावा वाढदिवस साजरा केला. त्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्या द्रविडने १६४ कसोटी आणि ३४० वन डे सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने २००५-०७ पर्यंत राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले आहे. द्रविड सध्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत चौथ्या क्रमांकावर आहे, त्याने १३,२८८ धावा केल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये त्याने १० हजाराहून अधिक धावा करणाऱ्या १४ फलंदाजांमध्ये स्थान कायम राखले आहे.
भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला हरवून ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी केली बरोबरी
द्रविडची नोव्हेंबर २०२१मध्ये भारतीय पुरुष संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि सध्या तो श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत संघासोबत आहे. त्याने आपला वाढदिवस कोलकाता येथे भारतीय संघाच्या सदस्यांसोबत साजरा केला आणि मालिकेच्या दुसऱ्या वन डे सामन्यादरम्यान तो ड्रेसिंग रूममध्ये बसला तेव्हा समालोचकांनी त्याच्या कारकीर्दिबाबत चर्चा सुरू केली. यावेळी मैदानावरील स्क्रिनवर द्रविडच्या कारकीर्दिची आकडेवारी दाखवण्यात आली आणि ती पाहून द्रविडच्या गाळावरील कळी फुलली.
दरम्यान, भारतीय संघाने कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात ४ विकेट्स राखून विजय मिळवला. या निकालासह भारताने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. कुलदीप यादवने पुनरागमनाचा सामना गाजवला आणि मोहम्मद सिराजने त्याला साजेशी साथ दिली. फलंदाजीत लोकेश राहुलने संयमी खेळ करताना भारताचा विजय निश्चित केला. लोकेश १०३ चेंडूंत ६ चौकारांसह ६४ धावांवर नाबाद राहिला. भारताचा वन डे क्रिकेटमधील श्रीलंकेवरील हा ९५ वा विजय ठरला आणि वन डे क्रिकेटमध्ये एकाच प्रतिस्पर्धीविरोधात सर्वाधिक विजयाच्या ऑस्ट्रेलियाच्या ( वि. न्यूझीलंड) वर्ल्ड रेकॉर्डशी भारताने बरोबरी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"