Join us  

IND vs SL 2nd ODI: श्रीलंकेच्या 'वँडर'बॉयची कमाल! फिरकीच्या जाळ्यात अडकली टीम इंडिया, ३२ धावांनी पराभूत

Jeffrey Vandersay Sri Lanka, IND vs SL 2nd ODI: जेफ्री वँडरसेने रोहित, विराट, राहुल, श्रेयस, गिल सारख्या दिग्गजांना तंबूत पाठवत संघाला मिळवून दिला विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 9:56 PM

Open in App

Jeffrey Vandersay Sri Lanka, IND vs SL 2nd ODI: पहिला सामना बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या वनडे मध्ये श्रीलंकेने भारताला ३२ धावांनी पराभूत केले आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर अविष्का फर्नांडो (४०), कामिंडु मेंडिस (४०) आणि दुनिथ वेल्लालागे (३९) या फलंदाजांच्या चिवट खेळीच्या जोरावर श्रीलंकेने २४० धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या बळावर भारतीय डावाची सुरुवात दमदार झाली. पण त्यानंतर श्रीलंकेचा फिरकीपटू जेफ्री वँडरसे याने भारतीय फलंदाजांची अक्षरश: पळता भूई थोडी झाली. भारताचा डाव २०८ धावांत आटोपला तर वँडरसेने ३३ धावांत ६ बळी टिपले.

 

वँडरसेच्या वादळात भारतीय फलंदाजी उद्ध्वस्त

रोहित शर्मा आणि शुबमन गिल जोडीने दमदार सुरुवात करत ९७ धावांची सलामी दिली. रोहितने ४४ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६४ धावा केल्या. पण जेफ्री वँडरसेच्या वादळाने भारताचा डाव उधळला. रोहित रिव्हर्स स्वीप खेळताना बाद झाला. त्यानंतर शुबमन गिल (३५), विराट कोहली (१४), शिवम दुबे (०), श्रेयस अय्यर (७) आणि के एल राहुल (०) यांना वँडरसेने तंबूत पाठवले. त्यानंतर वँडरसेला बराच काळ गोलंदाजी न दिल्यामुळे अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर खेळपट्टीवर स्थिरावले. या दोघांनी ३८ धावांची भागीदारी केल्यानंतर अक्षर पटेल बाद झाला. ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४४ धावा करणाऱ्या अक्षरला कर्णधार असलंकाने बाद केले. पाठोपाठ वॉशिंग्टन सुंदरही १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर सिराज ४ धावांवर बाद झाला. अखेर अर्शदीप सिंह एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत झाला आणि भारताचा डाव २०८ धावांवर आटोपला.

असा रंगला श्रीलंकेचा डाव

तत्पूर्वी, श्रीलंकेने पहिल्याच चेंडूवर पाथुम निसंकाची विकेट गमावली. दुसरा सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिस या जोडीने संघाला ७४ धावांची भागीदारी करून दिली. वॉशिंग्टन सुंदरने ही जोडी फोडत अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिस यांना सलग दोन षटकांत माघारी धाडले. त्यानंतर अक्षर पटेलने समरविक्रमाला १४ धावांवर, कुलदीप यादवने जनीथ लियानागेला १२ धावांवर तर सुंदरने कर्णधार चरिथ असलंकाला २५ धावांवर बाद केले. त्यामुळे श्रीलंकेची अवस्था ३५व्या षटकापर्यंत ६ बाद १३६ झाली होती. नंतर दुनिथ वेल्लालागे आणि कमिंडु मेंडिस या दोघांनी श्रीलंकेचा डाव सावरला. ७२ धावांची भागीदारी करणाऱ्या दुनिथ वेल्लालागे कुलदीपने ३९ धावांवर तंबूत पाठवले. कमिंडू मेंडिसने ४० धावा केल्या. तर अकिला धनंजया १५ धावांवर बाद झाला. त्यामुळे श्रीलंकेने ९ बाद २४० धावा केल्या.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाश्रीलंकाभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघरोहित शर्माविराट कोहली