Mohammad Siraj IND vs SL 2nd ODI Live Updates: भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. त्यातील पहिला सामना ड्रॉ झाला. त्यानंतर आज दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंका याने टॉस जिंकून पुन्हा एकदा प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला. श्रीलंकेने स्टार खेळाडू वानिंदू हसरंगासह दोघांना संघाबाहेर ठेवत महत्त्वाचे बदल केले. भारतीय संघाने मात्र आधीचाच संघ कायम ठेवला. त्याचे फळ भारतीय गोलंदाजीला पहिल्याच चेंडूवर मिळाले. श्रीलंकेविरूद्ध गेल्या काही वनडे सामन्यात विक्रमी कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराजने आज पुन्हा एकदा मोठा पराक्रम केला आणि दिग्गज गोलंदाज जहीर खान याच्या कामगिरीशी बरोबरी केली.
सामना सुरु झाला तेव्हा सिराज पहिले षटक टाकण्यासाठी धावला. सामन्याचा पहिलाच चेंडू टप्पा पडून थोडासा स्विंग झाला आणि फलंदाजाच्या बॅटची एज लागून किपरकडे गेला. हा फलंदाज होता सलामीवीर पाथूम निसंका. निसंकाच्या बॅटला लागून गेलेला चेंडू यष्टीरक्षक राहुलने झेलला आणि त्यामुळे सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर पाथूम निसंका झेलबाद झाला. मोहम्मद सिराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत जहीर खान आणि प्रवीण कुमार या दोघांच्या पराक्रमाशी बरोबरी साधली.
-----
श्रीलंकेच्या सलामीवीराला वनडे क्रिकेटमध्ये भारतीय गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर बाद करण्याची ही चौथी वेळी ठरली. याआधी भारतीय दिग्गज गोलंदाज जहीर खान याने श्रीलंकेविरुद्ध २००२ आणि २००९ असा दोन वेळा हा पराक्रम केला होता. त्यानंतर २०१० मध्ये स्विंग गोलंदाजीत निष्णात असलेल्या प्रवीण कुमारने ही कामगिरी केली होती. त्यानंतर आज पुन्हा सिराजने ही कामगिरी केली.