Wanindu Hasaranga ruled out, IND vs SL 2nd ODI Live Updates: श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे भारताविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. पहिल्या वनडे सामन्यातील रोमहर्षक टायनंतर, आज भारत आणि श्रीलंका आर प्रेमदासा स्टेडियमवर दुसऱ्या वनडेत आमनेसामने असतील. आपल्या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू टाकताना हसरंगाच्या स्नायूंवर ताण आला. त्यामुळे त्याला उर्वरित वनडे मालिकेला मुकावे लागणार आहे. हसरंगा दुखापतग्रस्त झाल्याने श्रीलंकेची गोलंदाजी थोडीशी कमकुवत झाली आहे. कारण त्यांच्याकडे आधीच मथिशा पाथिराना, दिलशान मदुशंका, दुष्मंथा चमिरा आणि नुवान तुषारासारखे आघाडीचे गोलंदाज दुखापतग्रस्त असल्याने मालिकेत खेळत नाहीत. त्यात हसरंगाच्या अनुपस्थितीने त्यांना मोठा धक्का बसला आहे.
पहिल्या सामन्यात हसरंगाचे ३ बळी
पहिल्या सामन्यात वानिंदू हसरंगाने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने भारतीय संघातील तीन प्रमुख फलंदाजांना बाद केले. विराट कोहलीला पायचीत केल्यानंतर त्याने केएल राहुलला बाद केले. याशिवाय हसरंगाने कुलदीप यादवचीही मोक्याच्या क्षणी विकेट घेतली.
श्रीलंकन बोर्ड काय म्हणाले?
श्रीलंका क्रिकेटने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, वानिंदू हसरंगाच्या डाव्या हाताला दुखापत झाल्यामुळे तो उर्वरित वनडे मालिकेत खेळू शकणार नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, त्याच्या वैयक्तिक १०व्या षटकाचा शेवटचा चेंडू टाकताना त्याच्या डाव्या हाताच्या स्नायूंवर ताण आला. त्याचा MRI करण्यात आला, ज्यात दुखापत थोडीशी गंभीर स्वरुपाची असल्याचे उघड झाले.
हसरंगाच्या जागी संघात कोण?
हसरंगाच्या जागी जेफ्री वँडरसेचा संघात समावेश करण्यात आला आहे. ३४ वर्षीय वँडरसेने श्रीलंकेसाठी शेवटची वनडे या वर्षी जानेवारीमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळली होती. या मालिकेतील दुसरी वनडे आज तर तिसरी वनडे ७ ऑगस्टला फक्त आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल. मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांना उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील.
शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी श्रीलंकेचा संघ:- पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, ड्युनिथ वेलगे, अकिला धनंजय, मोहम्मद शिराझ, असिथा फर्नांडो, जेफ्री वँडरसे, जेनिथ वेलगे, कामिंदू मेंडिस, निशान मदुष्का, महिश तिक्षणा, इशान मलिंगा.