Kuldeep Yadav Video, Ind vs SL 2nd ODI: कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम खेळ दाखवला. विशेषत: कुलदीप यादवने आपली फिरकी गोलंदाजीला अशा पद्धतीने केली की विरोधी फलंदाज हतबल झाल्याचे दिसले. या डावखुऱ्या गोलंदाजाने १० षटकांत ५१ धावा देत तीन बळी टिपले. त्यामुळे श्रीलंकेचा संघ अवघ्या २१५ धावांत गुंडाळला गेला. श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी करत तीन बळी घेतले. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाची कुलदीप यादवने घेतलेली विकेट खूपच खास होती. शनाकाला चेंडू स्वीप करायचा होता, पण कुलदीपने मात्र चतुराईने गोलंदाजी करून मागच्या बाजूने त्याची दांडी गुल केली.
कुलदीपने शनाकाला अडकवलं जाळ्यात
कुलदीप यादवने घेतलेल्या तीन विकेटमध्ये दासून शनाकाची विकेट खास होती. चार विकेट पडल्यानंतर क्रीझवर आलेल्या शनाकाने चेंडू मारण्याचा अतोनात प्रयत्न केला. त्या प्रयत्नात त्याला फटका मारणं जमलं नाही. कुलदीप लेगस्टंपवर फेकलेला चेंडू स्वीप करून त्याला चौकार मारायचा होता. मात्र, कुलदीपचा चेंडू फारसा वळला नाही आणि स्वीप करण्याच्या प्रयत्नात शनाका पूर्णपणे फसला आणि क्लीन बोल्ड झाला.
दरम्यान, या सामन्यात श्रीलंकेचा संघ एका वेळी एका विकेटच्या मोबदल्यात १०२ धावा करून सुस्थितीत होता, मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी असे पुनरागमन करत श्रीलंकेच्या संघाचे मोठे धावसंख्या करण्याचे मनसुबे धुळीस मिळवले. श्रीलंकेसाठी नुवानिडू फर्नांडोने सर्वाधिक ५० आणि कुसल मेंडिसने ३४ धावा केल्या. याशिवाय श्रीलंकेकडून ड्युनिथ वेलालेगेने ३२ आणि वनिंदू हसरंगाने २१ धावांचे योगदान दिले. भारताकडून कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. उमरान मलिकने दोन आणि अक्षरने एक विकेट घेतली.
कुलदीपच्या नावे २०० विकेट्स
कुलदीप यादवला खेळण्याच्या इतक्या संधी मिळत नाहीत. कसोटी क्रिकेटमध्ये आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजा असताना त्याला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळत नाही. त्याचबरोबर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चहल, सुंदर आणि अक्षर पटेलसारखे फिरकीपटू संघाची पहिली पसंती असतात. कुलदीप यादवने आतापर्यंत भारतासाठी ८ कसोटी, ७४ एकदिवसीय आणि २५ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि २०० आंतरराष्ट्रीय बळींचा टप्पा गाठला.