Rohit Sharma Virat Kohli, IND vs SL 2nd T20 Live Updates : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या टी२० कर्णधारपदाची सुरूवात दणक्यात झाली. न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्याविरूद्धच्या टी२० मालिका रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ३-० ने जिंकल्या. त्यानंतर आता श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतही भारतीय संघाने १-०ने आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला विश्वविक्रम करण्याची संधी आहे. तसेच, माजी कर्णधार विराट कोहलीचा मोठा विक्रमही रोहितच्या दृष्टीपथात आहे.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेविरूद्ध जर दुसरी टी२० जिंकली, तर रोहितला एक विश्वविक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे. मायदेशात सर्वाधिक टी२० सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत रोहित शर्मा हा संयुक्तपणे पहिल्या स्थानी आहे. रोहितने १६ पैकी १५ सामने जिंकले आहेत. इंग्लंडचा इयॉन मॉर्गन आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन यांच्यासह रोहित संयुक्तपणे अव्वल स्थानी आहे. जर आज धर्मशालाच्या मैदानावर रोहितची टीम इंडिया जिंकली तर रोहित या यादीत सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार ठरण्याचा विश्वविक्रम करू शकेल. या यादीत विराटचे १३ विजय तर धोनीचे १० विजय आहेत.
रोहितच्या विक्रमांची यादी येथेच संपत नाही. रोहितला आणखी दोन विक्रम खुणावत असून त्यातील एक विक्रम हा विराटच्या पराक्रमाला धक्का लावणारा आहे. एका खास यादीत स्थान मिळवण्यासाठी रोहित शर्माला आता केवळ १९ धावांची गरज आहे. ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच, इंग्लंडचा इयॉन मॉर्गन, भारताचा विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि पाकिस्तानचा बाबर आझम यांनी टी२० कर्णधार म्हणून हजार धावांचा टप्पा गाठला आहे. १९ धावा करताच रोहितही या यादीत स्थान मिळवू शकेल.
रोहितला आणखी एक विक्रम खुणावतो आहे. टी२० कर्णधार म्हणून हजार धावांचा टप्पा सर्वात जलद गतीने गाठणारा दुसऱ्या क्रमांकाचा कर्णधार बनवण्याची रोहितकडे संधी आहे. पाकिस्तानच्या बाबर आझमने सर्वात जलद २६ डावांत ही किमया साधली होती. रोहित मात्र २७ डाव खेळलेला आहे. त्यामुळे त्याला बाबरचा विक्रम मोडणे शक्य नाही. पण माजी कर्णधार विराट कोहलीचा ३० डावांचा विक्रम मात्र तो मोडू शकतो. या बाबतीत सर्वात संथगतीने हजार धावांचा टप्पा गाठणारा कर्णधार हा भारताचा महेंद्रसिंग धोनी (५७ डाव) आहे.