धरमशाला - पहिल्या टी-२० सामन्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र आज धरमशाला येथे होत असलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यावर पावसाचे सावट असल्याने भारतीय क्रिकेट संघाच्या विजयी मोहिमेत अडथळा येण्याची शक्यता आहे. सलग १० टी-२० सामने जिंकून सुरू ठेवलेली विजय मालिका कायम राखण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न आहे. मात्र पावसामुळे या प्रयत्नांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतामध्ये या शुक्रवारी आणि शनिवारी मुसळधार पावसाची शक्यता होती. पैकी शुक्रवारी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडला होता. तर शनिवारी धरमशाला येथे पावसाची शक्यता ९० टक्के आहे. त्यासोबतच तापमानसुद्धा ७ ते १० डिग्रीदरम्यान राहण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान पावसासोबतच कडाक्याची थंडीही असण्याची शक्यता आहे. एकंदरीत पावसामुळे दुसऱ्या सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे.
धरमशाला येथील खेळपट्टी ही नेहमीच वेगवान गोलंदाजांना मदतगार ठरत असते. धरमशालामधील हवामान आणि येथील परिस्थिती गोलंदाजांसाठी अनुकूल आणि फलंदाजांची कसोटी घेणारी ठरू शकते. लखनौमध्ये झालेल्या पहिल्या टी-२० मध्ये भुवनेश्वर कुमारने पहिल्या दोन षटकांमध्येच दोन बळी टिपले होते. आता धरमशालामधील वातावरण त्याच्या गोलंदाजीला मदतगार ठरू शकते. तर स्विंग गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजही अडखळत असल्याने श्रीलंकेकडेही मालिकेत पुनरागमन करण्याची संधी असेल.
दरम्यान, पावसामुळे आज होणारा टी-२० सामना हा पूर्ण २० षटकांचा होईल का, याबाबत शंका निर्माण झालेली आहे. भारतीय क्रिकेट संघ धरमशाला येथे आतापर्यंत केवळ एकच टी-२० सामना खेळला आहे. त्यात त्याला पराभव पत्करावा लागला होता. हा इतिहास बदलण्याचा आजच्या सामन्यात भारतीय संघाचा प्रयत्न असेल.