India vs Sri Lanka 2nd T20I : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियानं पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात यजमान श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे आणि आजच्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून श्रीलंका मालिका बरोबरीत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण, आज होणारा हा सामना स्थगित करावा लागला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि त्यामुळे आजचा होणारा सामना बुधवारी होण्याची शक्यता आहे.
कृणालचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंना विलगिकरणात जावं लागलं आहे. या सर्वांचे रिपोर्ट येईपर्यंत त्यांना विलगिकरणातच रहावे लागणार आहे. ''कृणाल पांड्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि त्यामुळे दुसरा ट्वेंटी-20 सामना स्थगित करावा लागत आहे. अन्य खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास हा सामना बुधवारी खेळवण्यात येईल. सध्या सर्व खेळाडू विलगिकरणात आहेत,''असे सूत्रांनी ANI ला सांगितले. ( The second T20 international match between Sri Lanka vs India at Colombo's Premadasa Stadium tonight has been halted after Krunal Pandya tested positive for COVID today. The match will be played on Wednesday.)
पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांचा इंग्लंड दौरा अडचणीत?कृणालचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळल्यामुळे पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांचा इंग्लंड दौरा अडचणीत येण्याची शक्यता आहे. बीसीसीआयनं सोमवारीच या दोन्ही खेळाडूंची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड केल्याचे जाहीर केले. शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांना दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यावरून माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्यांना बदली खेळाडू म्हणून बीसीसीआयनं पृथ्वी व सूर्यकुमारची निवड केली.