India vs Sri Lanka 2nd T20I Live : ५७ धावांत ५ फलंदाज माघारी परतल्यानंतर भारतीय संघ कमबॅक करत नाही असेच वाटले होते. पुण्याच्या स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकही शांत बसले होते, पण सूर्यकुमार यादव व अक्षर पटेल यांनी वातावरण बदलले. त्यांच्या फटकेबाजीने पुन्हा एकदा स्टेडियम जीवंत बनवले. अक्षरने २० चेंडूंत अर्धशतक झळकावताना षटकारांची आतषबाजी केली. १५व्या षटकापर्यंत दोघांनी ३५ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी केली होती. भारताला अखेरच्या ५ षटकात आता ६८ धावा करायच्या होत्या.
इशान २, गिल ५, राहुल ५, हार्दिक १२! श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताचा निम्मा संघ माघारी पाठवला
कुसल मेंडिस व पथुम निसंका यांनी श्रीलंकेला आक्रमक सुरुवात करून दिली. पण, युझवेंद्र चहलने पहिले यश मिळवून दिले. उम्रान मलिकने ( Umran Malik) तीन विकेट्स घेतल्या, परंतु त्याने धावाही दिल्या. पुनरागमन करणाऱ्या अर्शदीप सिंगने आज ५ नो बॉल टाकले आणि त्याच्या या नो बॉलवर श्रीलंकेने आत्मविश्वास कमावला. कुसल मेंडिस ३१ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५२ धावांवर LBW झाला. अक्षरने २४ धावांत २, चहलने ३० धावांत १ विकेट घेतली. उम्रानने ४३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. शनाका ३० धावांवर झेलबाद झाला, परंतु अर्शदीपचा तो चेंडू No Ball ठरला. हार्दिकने रागात तोंड झाकून घेतले. शनाकाने २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. शनाका २२ चेंडूंत २ चौकार व ६ षटकार खेचत ५६ धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकेने ६ बाद २०६ धावा केल्या. अर्शदीपने २ षटकांत ३७ धावा दिल्या. शिवम मावीने ४ षटकांत ५३ धावा दिल्या.
प्रत्युत्तरात इशान किशन ( २) दुसऱ्याच षटकात कसून रजिथाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. पहिल्या चेंडूवर किशनची विकेट अन् अखेरच्या चेंडूवर शुबमन गिल ( ५) याला माघारी पाठवून रजिथने भारतावरील दडपण वाढवले. दिलशान मदुशंकाने तिसऱ्या षटकात पहिल्याच चेंडूवर पदार्पवीर राहुल त्रिपाठीची ( ५) विकेट घेतली अन् पुण्याच्या स्टेडियमवर सन्नाटा झाला. हार्दिक पांड्याही १२ धावांवर बाद झाला अन् भारत अडचणीत सापडला. चमिका करुणारत्नेही ही विकेट घेतली. दीपक हुडाही ९ धावा करून माघारी परतला अन् भारताचा निम्मा संघ ५७ धावांत गार झाला.
सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल या जोडीने भारतीयांना आशेचा किरण दाखवला. अक्षरने श्रीलंकेच्या फिरकीपटूंची चांगलीच धुलाई केली. १४व्या षटकात वनिंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर अक्षरने सलग तीन षटकार खेचले अन् शांत बसलेले प्रेक्षक पुन्हा भारताच्या नावाने जयजयकार करू लागले. त्याच षटकात सूर्यानेही हात मोकळे केले अन् षटकार खेचला आणि त्या षटकात २६ धावा आल्या. भारताला ३६ चेंडूंत ८३ धावा करायच्या होत्या. १५ व्या षटकात या दोघांनी १५ धावा चोपल्या. अक्षरने २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. सूर्यानेही षटकार खेचून ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"