India vs Sri Lanka 2nd T20I Live : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा ट्वेंटी-२० सामना पुण्यात खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसन ( Sanju Samson) दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी बीसीसीआयने देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या यष्टिरक्षक-फलंदाज जितेश शर्माचा ( Jitesh Sharma) समावेश केला आहे. मात्र, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. कारण यष्टिरक्षक इशान किशन आधीच टीमचा एक भाग आहे. संजूच्या जागी ऋतुराज गायकवाड किंवा राहुल त्रिपाठी यांच्यापैकी एकाला संधी दिली जाऊ शकते आणि त्यांचे आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील रेकॉर्ड पाहता कोणाला संधी द्यायची याबाबत हार्दिक पांड्याची डोकेदुखी वाढली आहे.
संजूकडे मधल्या फळीच्या फलंदाजीची जबाबदारी आहे. वानखेडेवर झालेल्या मागील ट्वेंटी-२० सामन्यात त्याने मधल्या फळीत फलंदाजी केली होती, परंतु त्याला केवळ पाच धावा करता आल्या होत्या. ऋतुराज बहुतेक ओपनिंगसाठी ओळखला जातो, तर राहुल त्रिपाठी मधल्या फळीत फलंदाजी करतो. अशा परिस्थितीत राहुल प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसू शकतो. मात्र, दोन्ही फलंदाजांची आकडेवारी पाहिली, तर राहुलपेक्षा ऋतुराजचे पारडे जड आहे.
ऋतुराजने टीम इंडियासाठी ८ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि त्याने १३५ धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलच्या ३६ सामन्यांत १२०७ धावा केल्या आहेत. राहुल अद्याप टीम इंडियासाठी एकाही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना खेळलेला नाही. त्याने आयपीएलच्या ७४ डावांमध्ये २७.६६ च्या सरासरीने १७९८ धावा केल्या आहेत.
दुसऱ्या ट्वेंटी-२० साठी भारताची अशीअसू शकते प्लेइंग इलेव्हन : हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी/ऋतुराज गायकवाड, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग/हर्षल पटेल, उमरान मलिक आणि शिवम मावी.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"