Join us  

IND vs SL 2nd T20I Live : थरार...! अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव यांची विक्रमी भागीदारी; पण, श्रीलंकेची विजयी डरकाळी

India vs Sri Lanka 2nd T20I Live : नाणेफेक जिंकूनही प्रथम गोलंदाजीचा हार्दिक पांड्याचा निर्णय हा अनेकांना पचलेला नव्हता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 10:46 PM

Open in App

India vs Sri Lanka 2nd T20I Live : नाणेफेक जिंकूनही प्रथम गोलंदाजीचा हार्दिक पांड्याचा निर्णय हा अनेकांना पचलेला नव्हता. त्यात श्रीलंकेच्या फलंदाजांनी दोनशेपार धावा चोपल्या. प्रत्युत्तरात भारताची आघाडीची फळी ढेपाळली. ५७ धावांत ५ फलंदाज माघारी परतल्यानंतर भारतीय चाहत्यांनी कमबॅकच्या आशाच सोडल्या होत्या. पण, सूर्यकुमार यादव व अक्षर पटेल यांनी वातावरणात प्राण फुंकले अन् त्यांच्या फटकेबाजीने स्टेडियम जीवंत झाले. या दोघांनी तुफान फटकेबाजी करताना भारताला विजय मिळवून दिलाच होता. १७व्या षटकानंतर हार्दिकने पाठवलेल्या मॅसेजनंतर शिवम मावीनेही गिअर बदलला अन् चांगलेच धुतले. पण, अखेरच्या षटकात अक्षरची विकेट गेली अन् भारताच्या हातून मॅचही निसटली. श्रीलंकेने विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.

6, 6, 6, 1, 6, 1, 6! धो डाला; अक्षर पटेलचे २० चेंडूंत अर्धशतक; सूर्याच्याही खणखणीत पन्नास धावा

इशान किशन ( २), शुबमन गिल ( ५), पदार्पवीर राहुल त्रिपाठी ( ५) , हार्दिक पांड्या ( १२) आणि  दीपक हुडा ( ९) आज अपयशी ठरल्याने भारताची अवस्था ५ बाद ५७ अशी दयनीय झाली होती. सूर्यकुमार आणि अक्षर  या जोडीने भारतीयांना आशेचा किरण दाखवला. १४व्या षटकात वनिंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर अक्षरने सलग तीन षटकार खेचले अन् शांत बसलेले प्रेक्षक पुन्हा जयजयकार करू लागले. त्याच षटकात सूर्यानेही हात मोकळे केले. १५ व्या षटकात या दोघांनी १५ धावा चोपल्या. अक्षरने २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. सूर्यानेही षटकार खेचून ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मदुशंकाने १६व्या षटकात श्रीलंकेला मोठी विकेट मिळवून दिली. ३६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार खेचणारा सूर्यकुमार ५१ धावांवर झेलबाद झाला. भारताला २४ चेंडूंत ५८ धावा हव्या होत्या अन् सर्व भीस्त अक्षरवर होती.  या दोघांनी ९१ धावांची भागीदारी केली आणि सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकावरील ट्वेंटी-२०तील भारताकडून ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. ( India vs Sri Lanka Live Scorecard Click here ) 

हार्दिकने १७व्या षटकानंतर ब्रेक दरम्यान वॉशिंग्टन सुंदरकडून शिवम मावी व अक्षर साठी मेसेज पाठवला अन् पुढच्याच षटकात मावीने ६, ४, ६ अशी फटकेबाजी केली. १८व्या षटकात १७ धावा आल्याने भारताला विजयासाठी १२ चेंडूंत ३३ धावांची आवश्यकता होती. ६ चेंडू २१ धावा असा सामना चुरशीचा आला. श्रीलंकेनेही २०व्या षटकात २० धावा चोपल्या होत्या आणि भारतही त्याच जागी उभा होता. अक्षर ३१ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह ६५ धावांवर बाद झाला अन् भारताचा पराभव पक्का झाला. भारताला ८ बाद १९० धावा करता आल्या आणि श्रीलंकेने १६ धावांनी सामना जिंकला. मावी १५ चेंडूंत २६ धावा करून बाद झाला. 

नो बॉलने हार्दिक पांड्या हैराण.. उम्रान मलिकने ( Umran Malik) तीन विकेट्स घेतल्या, परंतु त्याने धावाही दिल्या. पुनरागमन करणाऱ्या अर्शदीप सिंगने आज ५ नो बॉल टाकले आणि त्याच्या या नो बॉलवर श्रीलंकेने आत्मविश्वास कमावला. कुसल मेंडिस ३१ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५२ धावांवर LBW झाला. अक्षरने २४ धावांत २, चहलने ३० धावांत १ विकेट घेतली.  उम्रानने ४३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. शनाका ३० धावांवर झेलबाद झाला, परंतु अर्शदीपचा तो चेंडू No Ball ठरला. हार्दिकने रागात तोंड झाकून घेतले. शनाकाने २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. शनाका २२ चेंडूंत २ चौकार व ६ षटकार खेचत ५६ धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकेने ६ बाद २०६ धावा केल्या. अर्शदीपने २ षटकांत ३७ धावा दिल्या. शिवम मावीने ४ षटकांत ५३ धावा दिल्या. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकासूर्यकुमार अशोक यादवअक्षर पटेल
Open in App