Join us  

IND vs SL, 2nd T20I Live Updates : 4, 6, Wd, 6, 0, 6, W; बिनुरा फर्नांडोच्या अविश्वसनीय कॅचने संजू सॅमसनचं वादळ रोखले, Video 

India vs Sri Lanka, 2nd T20I Live Updates : रोहित शर्मा व इशान किशन हे सलामीवीर आज फार कमाल दाखवू शकले नसले तरी भारताने सामन्यावर पकड घेतली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 10:15 PM

Open in App

India vs Sri Lanka, 2nd T20I Live Updates : रोहित शर्मा व इशान किशन हे सलामीवीर आज फार कमाल दाखवू शकले नसले तरी भारताने सामन्यावर पकड घेतली आहे. श्रेयस अय्यर आणि संजू सॅसमन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४७ चेंडूंत ८४ धावांची भागीदारी करताना श्रीलंकेला बॅकफूटवर फेकले. पण, संजू सॅमसनचा ( Sanju Samson) बिनुरा फर्नांडोने ( Binura Fernando  )  घेतलेला झेल या मालिकेतील आतापर्यंतचा अफलातून ठरला. लाहीरु कुमाराच्या षटकात 4, 6, Wd, 6, 0, 6 अशी फटकेबाजी केल्यानंतर अखेरच्या चेंडूवर संजू बाद झाला. फर्नांडोने शॉर्ट थर्ड मॅनवर अविश्वसनीय कॅच घेतला. 

दानुष्का गुणतिलका व पथूम निसांका यांच्या सावध खेळाने श्रीलंकेचा मजबूत पाया रचला. निसांका आणि दासून शनाका यांनी अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी करून भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. निसांका व शनाका यांनी अखेरच्या ५ षटकांत ८० धावा चोपल्या. दानुष्का गुणतिलका व पथूम निसांका यांचा सावध खेळ सुरू केला. गुणतिलका २९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३८ धावा केल्या. दासून शनाका व निसांका यांनी पाचव्या विकेटसाठी २२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण करताना भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. भुवीने २६ चेंडूत ५८ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. निसांका  ५३ चेंडूंत ११ चौकारांसह ७५ धावांवर पायचीत झाला. शनाकाने २०व्या षटकात २० धावा चोपून श्रीलंकेला ५ बाद १८३ धावांपर्यंत मजल मारून दिली. शनाकाने १९ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ४७ धावा केल्या. भुवनेश्वर, जसप्रीत, युझवेंद्र, रवींद्र व हर्षल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 

प्रत्युत्तरात चमिराने पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रोहितचा त्रिफळा उडवला. रोहितच्या बॅटला लागून चेंडू यष्टिंवर आदळला अन् त्याला माघारी जाताना पाहून प्रेक्षकांमध्ये उभी असलेली तरुणी नाराज झाली. कॅमेरामननेही त्याचवेळी तिच्याकडे कॅमेरा वळवला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच फलंदाजाला सर्वाधिक ५ वेळा बाद करण्याचा विक्रम यावेळी चमिराने नावावर केला. फॉर्मात असलेला इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी त्यानंतर दमदार खेळ करताना २५ चेंडूंत ३५ धावांची भागीदारी केली. लाहिरू कुमाराने किशनची ( १६) विकेट घेतली. पण, अय्यरने याचे दडपण अजिबात होऊ दिले नाही आणि त्याने प्रविण जयविक्रमाच्या षटकात सलग दोन खणखणीत षटकार खेचले. 

संजू सॅमसनला आज फलंदाजीला पुढे पाठवले गेले आणि ६ धावांवर त्याला जीवदान मिळाले. भारताच्या १० षटकांत २ बाद ८० धावा झाल्या होत्या आणि त्यांना ६० चेंडूंत विजयासाठी १०४ धावा हव्या होत्या. अय्यरने ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. सेट झालेल्या संजू सॅमसननेही मग हात मोकळे केले. १३व्या षटकात त्याने कुमाराला तीन खणखणीत षटकार व एक चौकारासह २३ धावा कुटल्या. पण, त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर फर्नांडोने स्लीपमध्ये अविश्वसनीय कॅच घेतला. सॅमसन २५ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३९ धावांवर माघारी परतला.    

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकासंजू सॅमसनश्रेयस अय्यर
Open in App