Join us  

Rohit Sharma, IND vs SL, 2nd T20I Live Updates : रोहित शर्मा खूश झाला; प्रतिभावंत खेळाडूंना संधीची गरज आहे आणि मी त्यांच्या पाठिशी आहे, असं म्हणाला!

भारताचा हा सलग ११वा ट्वेंटी-२० विजय आहे, तर रोहितच्या नेतृत्वाखालील घरच्या मैदानावर मिळवलेला १६वा विजय आहे. यासह रोहितने इयॉन मॉर्गन व केन विलियम्सन यांचा विक्रम मोडला. या दोघांनी घरच्या मैदानावर प्रत्येकी १५ विजय मिळवले होते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 11:02 PM

Open in App

India vs Sri Lanka, 2nd T20I Live Updates : श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer), संजू सॅमसन ( Sanju Samson) आणि रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांनी तुफान फटकेबाजी करताना श्रीलंकेविरुद्धची मालिका खिशात घातली. भारताने सलग तिसरी ट्वेंटी-२० मालिका जिंकली.  घरच्या मैदानावर सर्वाधिक ट्वेंटी-२० सामने जिंकणाऱ्या संघाशी भारताने आज बरोबरी केली. भारताचा हा ३९वा ट्वेंटी-२० विजय आहे आणि त्यांनी न्यूझीलंडशी बरोबरी केली. श्रीलंकेविरुद्धचा हा १६ वा विजय आहे आणि एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याच्या पाकिस्तानच्या ( वि. झिम्बाब्वे) विक्रमाशीही भारताने बरोबरी केली आहे.  

दानुष्का गुणतिलका व पथूम निसांका यांच्या सावध खेळाने श्रीलंकेचा मजबूत पाया रचला. दानुष्का गुणतिलका व पथूम निसांका यांचा सावध खेळ सुरू केला. गुणतिलका २९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३८ धावा केल्या. दासून शनाका व निसांका यांनी पाचव्या विकेटसाठी दमदार भागीदारी केली. निसांका  ५३ चेंडूंत ११ चौकारांसह ७५ धावांवर पायचीत झाला. शनाकाने २०व्या षटकात २० धावा चोपून श्रीलंकेला ५ बाद १८३ धावांपर्यंत मजल मारून दिली. शनाकाने १९ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ४७ धावा केल्या. 

प्रत्युत्तरात रोहित शर्मा व इशान किशन आज स्वस्तात माघारी परतले. श्रेयस अय्यर आणि संजू सॅसमन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४७ चेंडूंत ८४ धावांची भागीदारी केली. सेट झालेल्या संजू सॅमसननेही मग हात मोकळे केले. १३व्या षटकात त्याने कुमाराला तीन खणखणीत षटकार व एक चौकारासह २३ धावा कुटल्या. पण, त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर फर्नांडोने स्लीपमध्ये अविश्वसनीय कॅच घेतला. सॅमसन २५ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर रवींद्र जडेजा व अय्यर यांनी ४.१ षटकांत ५८ धावांची भागीदारी केली. भारताने ७ विकेट्स व १७ चेंडू राखून हा सामना जिंकताना मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. अय्यर ४४ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ७४ धावांवर, तर जडेजा १८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ४५ धावांवर नाबाद राहिला.

सामन्यानंतर रोहित काय म्हणाला?''मधल्या फळीचे सातत्याने धावा करणे, हे खूप समाधानकारक आहे. मला गोलंदाजांवर भडकायचे नाही. अशा वातावरणात असे घडते, परंतु १५ षटकापर्यंत गोलंदाजांनी श्रीलंकेला रोखले होते. फलंदाजीसाठी उपयुक्त खेळपट्टी होती. संघात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत आणि त्यांनी ती दाखवण्यासाठी संधीची व संघाच्या पाठिंब्याची गरज आहे. जड्डूने सकारात्मक खेळ करताना पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी केली, श्रेयसचा खेळ अप्रतिम होता. संजू सॅमसनमध्येही प्रतिभा कुटून भरली आहे. त्याच्यासारख्या खेळाडूला संधी मिळणे गरजेचे आहे. अन्य खेळाडूंनाही लवकरच संधी मिळेल,''असे रोहित म्हणाला. 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारोहित शर्मासंजू सॅमसन
Open in App