India vs Sri Lanka, 2nd T20I Live Updates : दानुष्का गुणतिलका व पथूम निसांका यांच्या सावध खेळाने श्रीलंकेचा मजबूत पाया रचला. निसांका आणि दासून शनाका यांनी अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी करून भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. निसांकाने ७५ धावांची दमदार खेळी केली. दासून शनाकानेही चांगली फटकेबाजी केली. निसांका व शनाका यांनी अखेरच्या ५ षटकांत ८० धावा चोपल्या. श्रीलंकेच्या ५ बाद १८३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताला पहिल्याच षटकात धक्का बसला. रोहित शर्मा ( १) धावांवर त्रिफळाचीत झाला, दुष्मंथा चमिराने ही विकेट घेत विक्रम रचला.
दानुष्का गुणतिलका व पथूम निसांका यांचा सावध खेळ सुरू केला. भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमराह यांनी पहिली चार षटकं अप्रतिम फेकली. गुणतिलका व निसांका यांनी पाचव्या षटकापासून धावांचा वेग वाढवण्यास सुरूवात केली. ९व्या षटकात रोहितने गोलंदाजीसाठी रवींद्र जडेजाला आणले आणि त्याने ही जोडी तोडली. गुणतिलका २९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३८ धावा केल्या. त्यापुढील षटकात युझवेंद्र चहलने नुकताच मैदानावर आलेल्या चरित असालंकाला ( २) पायचीत पकडले. ११व्या षटकात पटेलने श्रीलंकेला धक्का देताना कामिल मिशाराला ( १) बाद केले.
दासून शनाका व निसांका यांनी पाचव्या विकेटसाठी २२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण करताना भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. भुवीने २६ चेंडूत ५८ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. निसांका ५३ चेंडूंत ११ चौकारांसह ७५ धावांवर पायचीत झाला. शनाकाने २०व्या षटकात २० धावा चोपून श्रीलंकेला ५ बाद १८३ धावांपर्यंत मजल मारून दिली. शनाकाने १९ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ४७ धावा केल्या. भुवनेश्वर, जसप्रीत, युझवेंद्र, रवींद्र व हर्षल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
प्रत्युत्तरात चमिराने पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रोहितचा त्रिफळा उडवला. रोहितच्या बॅटला लागून चेंडू यष्टिंवर आदळला अन् त्याला माघारी जाताना पाहून प्रेक्षकांमध्ये उभी असलेली तरुणी नाराज झाली. कॅमेरामननेही त्याचवेळी तिच्याकडे कॅमेरा वळवला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच फलंदाजाला सर्वाधिक ५ वेळा बाद करण्याचा विक्रम यावेळी चमिराने नावावर केला.
Web Title: IND vs SL, 2nd T20I Live Updates : Rohit Sharma departs for just 1 in 2 balls, Dushmantha Chameera becomes the first bowler to dismiss a particular batter at least 5 times in men's T20Is, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.