India vs Sri Lanka, 2nd T20I Live Updates : रोहित शर्मा व इशान किशन हे सलामीवीर आज फार कमाल दाखवू शकले नसले तरी भारताने दणदणीत विजय मिळवला. श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer), संजू सॅमसन ( Sanju Samson) आणि रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांनी तुफान फटकेबाजी करताना श्रीलंकेविरुद्धची मालिका खिशात घातली. भारताने सलग तिसरी ट्वेंटी-२० मालिका जिंकली.
दानुष्का गुणतिलका व पथूम निसांका यांच्या सावध खेळाने श्रीलंकेचा मजबूत पाया रचला. दानुष्का गुणतिलका व पथूम निसांका यांचा सावध खेळ सुरू केला. गुणतिलका २९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३८ धावा केल्या. दासून शनाका व निसांका यांनी पाचव्या विकेटसाठी दमदार भागीदारी केली. निसांका ५३ चेंडूंत ११ चौकारांसह ७५ धावांवर पायचीत झाला. शनाकाने २०व्या षटकात २० धावा चोपून श्रीलंकेला ५ बाद १८३ धावांपर्यंत मजल मारून दिली. शनाकाने १९ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ४७ धावा केल्या.
प्रत्युत्तरात चमिराने पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रोहितचा त्रिफळा उडवला. रोहितच्या बॅटला लागून चेंडू यष्टिंवर आदळला अन् त्याला माघारी परतला. लाहिरू कुमाराने इशान किशनची ( १६) विकेट घेतली. श्रेयस अय्यर आणि संजू सॅसमन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४७ चेंडूंत ८४ धावांची भागीदारी करताना श्रीलंकेला बॅकफूटवर फेकले. अय्यरने ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. सेट झालेल्या संजू सॅमसननेही मग हात मोकळे केले. १३व्या षटकात त्याने कुमाराला तीन खणखणीत षटकार व एक चौकारासह २३ धावा कुटल्या. पण, त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर फर्नांडोने स्लीपमध्ये अविश्वसनीय कॅच घेतला. सॅमसन २५ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३९ धावांवर माघारी परतला.
त्यानंतर रवींद्र जडेजा व अय्यर यांनी ४.१ षटकांत ५८ धावांची भागीदारी केली. भारताने ७ विकेट्स व १७ चेंडू राखून हा सामना जिंकताना मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. अय्यर ४४ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ७४ धावांवर, तर जडेजा १८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ४५ धावांवर नाबाद राहिला. भारताचा हा सलग ११वा ट्वेंटी-२० विजय आहे, तर रोहितच्या नेतृत्वाखालील घरच्या मैदानावर मिळवलेला १६वा विजय आहे. यासह रोहितने इयॉन मॉर्गन व केन विलियम्सन यांचा विक्रम मोडला.