India vs Sri Lanka, 2nd T20I Live Updates : दानुष्का गुणतिलका व पथूम निसांका यांच्या सावध खेळाच्या जोरावर श्रीलंकेने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात चांगली सुरुवात केली, परंतु भारतीय गोलंदाजांनी टप्प्याटप्याने त्यांना धक्के देण्याचे सत्र सुरू ठेवले. पथूम निसांका आणि दासुन शनाका यांनी अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी करून भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. निसांकाने ७५ धावांची दमदार खेळी केली. दासून शनाकानेही चांगली फटकेबाजी केली.
दानुष्का गुणतिलका व पथूम निसांका यांचा सावध खेळ सुरू केला. भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमराह यांनी पहिली चार षटकं अप्रतिम फेकली. जसप्रीतच्या दुसऱ्याच षटकात भारताने DRS घेतला, परंतु तो वाया गेला. गुणतिलका व निसांका यांनी पाचव्या षटकापासून धावांचा वेग वाढवण्यास सुरूवात केली. ९व्या षटकात रोहितने गोलंदाजीसाठी रवींद्र जडेजाला आणले आणि त्याने ही जोडी तोडली. गुणतिलकाचा फटका चूकला अन् उत्तुंग उडालेला चेंडू वेंकटेश अय्यरने सुरेखरित्या टिपला. गुणतिलका २९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३८ धावा केल्या. त्यापुढील षटकात युझवेंद्र चहलने नुकताच मैदानावर आलेल्या चरित असालंकाला ( २) पायचीत पकडले. ११व्या षटकात पटेलने श्रीलंकेला धक्का देताना कामिल मिशाराला ( १) बाद केले.
निसांका एक बाजूने खिंड लढवत होता. दुसऱ्या बाजूने लंकेचे फलंदाजाचे माघार सत्र सुरूच होते. दिनेश चंडिमल १५व्या षटकात बुमराहच्या गोलंदाजीवर फसला अन् रोहितने सोपा झेल घेत त्याला माघारी पाठवला. रोहितचा हा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ५०वा झेल ठरला आणि असा पराक्रम करणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. यासह त्याने पाकिस्तानचा शोएब मलिक ( ५० झेल) याच्याशी बरोबरी केली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १२४ सामने खेळण्याच्या बाबतीतही रोहितने मलिकशी बरोबरी केली आहे. ट्वेंटी-२०त सर्वाधिक झेल ( यष्टिरक्षक सोडून) डेव्हिड मिलर ( ६९), मार्टीन गुप्तील ( ६४) यांच्या नावावर आहेत. भारताकडून सर्वाधिक ५७ झेल हे महेंद्रसिंग धोनीने घेतले आहेत. त्यानंतर रोहित ( ५०), विराट कोहली ( ४३), सुरेश रैना ( ४२) व हार्दिक पांड्या ( ३४) यांचा क्रमांक येतो.
दासून शनाका व निसांका यांनी पाचव्या विकेटसाठी २२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण करताना भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. भुवीने २६ चेंडूत ५८ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. निसांका ५३ चेंडूंत ११ चौकारांसह ७५ धावांवर पायचीत झाला. शनाकाने २०व्या षटकात २० धावा चोपून श्रीलंकेला ५ बाद १८३ धावांपर्यंत मजल मारून दिली. शनाकाने १९ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ४७ धावा केल्या.